बीड kho-Kho World Cup 2025 : पहिल्यांदाच आयोजित झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडली. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारतीय महिला खो-खो संघानं 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला. हीच लय संघानं कायम ठेवत संघानं अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करत विश्वविजय मिळवला.
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा : भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.