ठाणे Fighting on Cricket Ground : सध्या राज्यभर टेनिस रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांची धूम सुरु आहे. अशातच सरावादरम्यान गोलंदाज हळू चेंडू फेकत असल्यानं फलंदाजानं त्याला या गोष्टीचा जाब विचारल्याच्या रागातून गोलंदाजानं फलंदाजालाच स्टंपनं बेदम मारहाण करुन नाकाचा लचका घेत गंभीर जखमी केल्याची घटना घडली समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील अंजूर गावातील क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर गोलंदाजाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर शाळीक मढवी (28) असं गुन्हा दाखल झालेल्या गोलंदाजचं नाव आहे, तर विराज शाम तरे (23) असं जखमी फलंदाजाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मयुर शाळीक मढवी आणि जखमी विराज शाम तरे हे दोघंही भिवंडी तालुक्यातील अंजूर गावात राहतात. त्यातच 18 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अंजूर गावातील सिध्दी विनायक क्रिकेट ग्राउंडवर गावातील क्रिकेटपटू सराव करीत होते. त्यावेळी विराज फलंदाजी करीत असताना त्याच्या समोर मयूर हा गोलंदाजी करायला आला असता मयूर हळू गोलंदाजी करीत असल्यानं विराजनं त्यास याचा जाब विचारुन तुला गोलंदाजी येत नाही, तर कशाला करतो असं बोलताच या गोष्टीचा राग मनात धरुन मयूरनं विराजला भर मैदानातच अश्लील शिवीगाळ केली. इतकंच नाही तर स्टंपनं त्याला बेदम मारहाण करुन विराजला खाली पाडून त्याच्या नाकाला चावा घेऊन त्यास गंभीर जखमी केलं आहे.
क्रिकेट खेळाडूंमध्ये : याप्रकरणी विराजच्या फिर्यादीवरून मयुरच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करत आहेत. मात्र या घटनेनंतर सिध्दी विनायक क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट खेळाडू मध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसंच या घटनेमुळं क्रिकेटपटूंमध्ये भीतीचं वाकावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा :