मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Result 2024 Vote Counting) आज (23 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाविकास आघाडी यांच्यातील लढतीच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र, सकाळपासूनच महाविकास आघाडीला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जागांवर महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. तर महायुती मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. या निवडणुकीत मतदानामध्ये महिलांची टक्केवारी जास्त होती. यावरुनच 'लाडकी बहीण योजना' महायुतीसाठी गेम चेंजर ठरली असल्याचं दिसून येत आहे.
विविध योजनांचा फायदा : लोकसभा निवडणुकीतील निकालात अपेक्षित कामगिरी करण्यात मागे पडलेल्या महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण योजना, युवा प्रशिक्षण योजना, अन्नपूर्णा योजना, तीर्थक्षेत्र दर्शन योजना, लेक लाडकी अशा योजनांचा त्यांनी धडाका लावला. या योजनांव्यतिरिक्त आरक्षण, हिंदुत्व, संविधान इत्याही मुद्देही यंदा चांगलेच गाजले. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांची मतं खेचून घेण्यामागील हेतूवर विरोधकांनी जोरदार ताशेरे ओढले. त्यामुळं निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीनंही त्यांचं सरकार आल्यास 'महालक्ष्मी योजने'तून लाडकी बहीण योजनेपेक्षा वाढीव निधी देण्याची हमी जाहीरनाम्यातून दिली. मात्र, यावेळी महिलांचा पाठिंबा महायुती सरकारला मिळाल्याचं बघायला मिळतंय.
लाडक्या बहिणींना भाऊबीजेचं दिलं गिफ्ट : लाडकी बहीण या योजनेची घोषणा महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात केली होती. यानंतर जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते 19 ऑगस्ट रोजी दिले. परंतु, केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार मतदारांवर प्रभाव पडण्यासाठी ही योजना असल्याची टीका विरोधकांनी केली. दुसरीकडं ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच चालू महिन्याचा आणि पुढील महिन्याचा हप्ताही सरकारनं लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला. म्हणजे आचारसंहिता लागल्यापूर्वी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देऊन महिला लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. घाईघाईनं दोन महिन्याचे हप्ते सरकारनं दिवाळीपूर्वीच जमा केल्याची टीका, विरोधकांनी केली. तर दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणीला भाऊबीजेचं गिफ्ट आपण दिल्याचा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्यामुळं लाडक्या बहिणींनीही सरकारची साथ दिल्याचं चित्र दिसून आले.
- मतदानात वाढ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळच्या जास्त मतदान झालं. ही मतदानाची टक्केवारी वाढवण्यात महिला मतदारांचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा -