मुंबई - राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या संख्येत लक्षणीय घट होतेय. विशेष म्हणजे नवीन वर्षातही परिस्थिती सारखीच असल्याचं दिसून येतंय. नवीन वर्षातील 14 दिवसांत 5 वाघांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. दरम्यान, मागील आठवड्यात नागपूरमध्ये चिकन खायला दिल्यामुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. या वाघांच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमींमधून हळहळ व्यक्त करण्यात येतोय. वाघांना चिकन खायला कोणी दिले, यास जे कोणी जबाबदार असतील आणि यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलीय. त्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
तसे पुन्हा घडता कामा नये : दरम्यान, चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्यात काही दिवसांपूर्वी फोटो आणि सेल्फीच्या नादात काही पर्यटकांनी एक वाघीण आणि तिच्या चार बछड्यांची वाट अडवली होती. पर्यटकांची पुढे आणि मागे गाडी असल्यामुळं त्या वाघिणीला आणि तिच्या बछड्यांना पुढे जायला वाट मिळत नसल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओची दखल घेऊन कोर्टानेही असे कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिलेत. यावर वन खात्याची काय भूमिका? असा प्रश्न गणेश नाईक यांना विचारला असता, पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. परंतु अभयारण्यातील कोणतेही प्राणी किंवा वाघ यांना हानी पोहोचवता कामा नये. फोटो, सेल्फीच्या नादात त्यांना काही इजा होईल, असे करता कामा नये. जे पर्यटक होते, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. याबाबत वन खातेही पाठपुरावा करेल, असे यावेळी गणेश नाईक म्हणालेत.
वाघांच्या वाढीसाठी प्रयत्न करणार : एकीकडे देशासह राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. ही बाब गंभीर आणि धक्कादायक आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार आणि वन खात्याकडून वाघांच्या संख्येत कशा प्रकारे वाढ करण्यात येतील किंवा जे जंगलात वाघ राहतात ते आपल्याच मॅपिंग किंवा परिसरात राहतील. मानवी वस्तीत येऊन माणसावर हल्ले करणार नाहीत आणि वाघांची संख्या कशी जास्तीत जास्त वाढवता येईल, यासाठी उपाययोजना करणार असल्याचं यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय.
हेही वाचा-