अमरावती : बटाटे, कोबी, पालक आणि मेथी अशा विविध भाज्यांसोबत हिंग, मिरे, वेलची, लवंग असे मसाले. आंबा, चिकू, पेरू यांसह स्ट्रॉबेरी अशी विविध फळं आणि विविधरंगी फुलांनी मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या वडगाव फत्तेपूर इथल्या विद्या मंदिर प्राथमिक शाळेची परसबाग बहरली आहे. विशेष म्हणजे दुर्मिळ असं लालचंदन देखील या परसबागेत आहे.
शाळेची परसबाग जणू शेतीच : विद्यार्थांना खेळायला जसं मोठं मैदान शाळेच्या आवारात आहे. त्यापेक्षा मोठी शेती विद्यार्थ्यांनी परसबागेत फुलवली आहे. वांगी, कोबी, बटाटा, टोमॅटो, आल्ले, मिरची, कोथिंबीर, पालक, मेथी, मुळा, गाजर असा सर्व प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी पिकवला जातो. जिकडं तिकडं भाजीपाला पाहून आपण शेतात फिरत आहोत असा अनुभव इथं येतो.
लाल स्ट्रॉबेरी : पेरू, आंबे, चिकू, द्राक्ष यांसह सफरचंद देखील या परसबागेत येतात. इतकचं नव्हे तर रसदार लालरांगाची स्ट्रॉबेरी देखील विद्यार्थ्यांना या परसबागेत चाखायला मिळते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी मेळघाटात चिखलदरा आणि मोथा येथील मातीत यशस्वीपणे आली. त्यामुळे आम्ही देखील शाळेच्या परसबागेत स्ट्रॉबेरी लावली आणि त्याच पिक घेतल्याचं शाळेचे मुख्याध्यापक श्रावण कावनपुरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
मागील वर्षी साजरं केलं तृणधान्य वर्ष : मागील वर्ष हे जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून सर्वत्र साजरं केलं गेल. त्याचं औचित्य साधून विद्यामंदिर शाळेत गहू, ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांची लागवड केली होती. या धान्यांची लागवड कशी करतात, त्यांची वाढ कशी होते, याची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना करून दिली असं सहायक शिक्षिका प्रज्ञा राऊत यांनी सांगितलं. आता पण जी काही वृक्ष या ठिकाणी लावली त्यांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली असं देखील प्रज्ञा राऊत म्हणल्या.
पाण्याचं योग्य नियोजन : परसबाग हिरवीगार करण्यासह शाळेत लावलेल्या प्रत्येक वृक्षला, वेलीला पाणी मिळावं यासाठी पाण्याचं विशेष नियोजन केलं आहे. ठिंबक सिंचन, तुषार सिंचन आणि मल्चिंगद्वारे पिकांना आणि झाडांना पाणी देत असल्याचं मुख्याध्यापक श्रावण कवनापुरे म्हणाले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी परसबागेत त्यांना जमेल ती कामं करतात. मेहनतीच्या कामासाठी मजूर लावण्यात आले असं देखील श्रावण कवनापुरे यांनी सांगितलं.
वृक्षांवर अनोखी कलाकृती : शाळेच्या परिसरात असणाऱ्या उंच वृक्षांवर असणाऱ्या विशिष्ट फांद्या एखाद्या प्राण्यासारख्या भासत असताना त्या ठिकाणी प्राण्यांची चित्र काढण्यात आली आहेत. अनेक वृक्षांवर सिंह, वाघ, माकड हत्ती यांची चित्र काढून जणू खरंच वृक्षांवर हे प्राणी आहेत की, काय असा भास या ठिकाणी होतो.
वऱ्हाड कायद्यातर्गत शाळेचं व्यवस्थापन : वडगाव फत्तेपूर येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळा 5 मे 1939 ला वऱ्हाड कायद्याअंतर्गत स्थापन झाली. या शाळेला खाजगी संस्थेसारखं व्यवस्थापन आहे. यामध्ये ग्रामपंचायतमधून पाच सदस्य येतात. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेद्वारे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व इतर सदस्य निश्चित केले जातात. अशा एकूण तीन शाळा अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत तर, विदर्भात नऊ शाळा सुरू आहेत. प्रत्येक शाळेला स्वतंत्र असा व्यवस्थापन कार्यकारी मंडळ असल्याची माहिती मुख्याध्यापक श्रावण कवनापुरे यांनी दिली.
हेही वाचा :