नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला काल घेराव घालण्यासाठीच्या झालेल्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय. काल युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या तब्बल 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलंय. काल युवक काँग्रेसने नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अचानक आंदोलन पुकारलं होतं, मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला दांडी मारल्याने ही कारवाई करण्यात आलीय.
शिवानी वडेट्टीवार यांनाही केलं कार्यमुक्त : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आलंय. पदावरून दूर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची सुपुत्री आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे यासह प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते निघाले संघ मुख्यालयाकडे : अवघ्या 50 ते 60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या कार्यालयावरून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली होती. मात्र सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यालयासमोरच अडवले होते. संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी निघालेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयापासून 50 पावलं पुढे जाऊ शकली नाहीत. त्यामुळे तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील 60 पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय.
हेही वाचा -