छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्री 2025 निमित्त बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीपासून भक्तिभावानं शिवभक्त घृष्णेश्वर मंदिर परिसरात दाखल होत आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं असलेलं हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळेच या ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. त्यामुळे देशातील अनेक शिवभक्त आवर्जून वेरूळ इथं येतात. "यंदा वाहतुकीची आणि सुरक्षेची विशेष उपाययोजना शिवभक्तांसाठी करण्यात आली," अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
12 ज्योतिर्लिंगात घृष्णेश्वराचं महत्व अधिक : भगवान शंकराची देशभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ इथलं घृष्णेश्वर मंदिर मानलं जाते. या मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे पहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत, तर हे पूर्वाभिमुख आहे. त्यामुळेच प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा घृष्णेश्वर भगवान असं मानलं जाते. घृष्णेश्वर मंदिराचं पूर्वाभिमुख म्हणजे पिंडीची पाणी बाहेर जाण्याची जागा प्रवेश आहे. देशभरात अकरा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येतो. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं शिवभक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात दाखल होत आपली मनोकामना मागून भगवान शंकराचा जयघोष करतात.
इंग्रजांनी ठेवलं एलोरा हे नाव : वेरूळ हा परिसर दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. त्यामध्ये बारावं ज्योतिर्लिंग असलेलं घृष्णेश्वर मंदिर तर त्याचबरोबर परिसरात असलेली जगविख्यात वेरूळ लेणी. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी या परिसरात येते. प्राचीन काळात या परिसराला आधी इल्लूरा असं म्हणलं जायचं. मात्र इंग्रजांनी त्या शब्दाचा उच्चार एलोरा असा केला आणि त्यामुळे आजही एलोरा असा उच्चार प्रचलित झाला. आजही त्याच नावानं हा परिसर ओळखला जातो.
पोलिसांनी लावला तगडा बंदोबस्त : "घृष्णेश्वर मंदिरात लाखोच्या संख्येनं भाविक दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीत मोठे बदल दरवर्षी करण्यात येतात. मात्र यावर्षी मंदिर परिसरात जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळी वाहतूक व्यवस्था करण्यात आली. तर मंदिर परिसरात आणि आतील बाजूस पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षितपणे आणि भक्ती भावानं दर्शन घेता येईल," असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :