कोल्हापूर : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विशिष्ट समाजाबाबत द्वेष पसरवल्याचा आरोप करत एका व्यक्तीने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन घरात घुसून मारण्याची धमकी दिली. इंद्रजीत सावंत यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. धमकी देणाऱ्याने स्वतःचं नाव प्रशांत कोरटकर असल्याचं इंद्रजीत सावंत यांना सांगितलं. सदर व्यक्तीने थेट मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उल्लेख करुन आपण नागपूरमधून बोलत असल्याचा उल्लेख केला. या घटनेनं राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
इंद्रजीत सावंत यांना नागपूरमधून धमकी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'श्रीमंत योगी' छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा साम्राज्याच्या इतिहासाबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत हे सातत्यानं समाज माध्यमात आपली भूमिका मांडतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाबाबत एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एका समाजाचा द्वेष पसरवल्याचा आरोप प्रशांत कोरटकर असं स्वतःचं नाव सांगणाऱ्या व्यक्तीने केला. त्यानं सेलफोनवरुन इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्याला दिली गेलेली धमकी आणि शिवीगाळ झाल्याची ऑडिओ क्लिप स्वतः इंद्रजीत सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकली आहे. यानंतर कोल्हापूरसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. 'जिथं असाल, तिथं येऊन आमची ताकद दाखवू, तुम्ही कितीही समाजाला एकत्र करा, अशा आशयाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलफोनवरून संभाषण करणाऱ्या प्रशांत कोरटकर असं नाव असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीने महापुरुषांबाबत देखील अवमानकारक वक्तव्य केलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. समाज माध्यमात हा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका : दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीबाबत दुपारी बाराच्या दरम्यान सावंत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. कोल्हापुरातून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीनं इंद्रजीत सावंत यांना पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत इंद्रजीत सावंत पोलिसांकडे तक्रार करतात का, यावर हे प्रकरण कुठल्या दिशेने जाईल, हे स्पष्ट होईल.
हेही वाचा :