शिर्डी : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde In Shirdi) हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (25 फेब्रुवारी) शिर्डीत माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी दोन्ही शिवसेनेतील नेत्यांचे कानं टोचले. तसंच विधिमंडळ देशाचं असो किंवा राज्याचं, ते लोकशाहीचं एक पवित्रस्थान आहे. अशा पवित्र ठिकाणावर शितोंडे उडवणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राम शिंदे? : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आरोप केले होते. यावरुनच आता दोन्ही शिवसेनांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "देशाला परंपरा असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून देशाला ओळखलं जातं. त्यामुळं लोकप्रतिनिधींनीदेखील देशाचं हित आणि संविधान लक्षात घेवून बोललं पाहिजे. दोन दिवसांपासून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी सुरू आहे. ते एकत्रित असल्यानं आपले अनुभव शेअर करत आहेत."
पुढं ते म्हणाले, "दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची सनसनाटी काही लोकांच्या मनात असते. त्यामुळं असं काही वक्तव्य झालं की, मुळ कार्यक्रम बाजूला राहतो. अनावश्यक गोष्टींना जास्त वाव मिळतो. त्यामुळं मराठी साहित्य संमेलनात अशा प्रकारच्या चर्चा व्हायला नको होत्या." दरम्यान, विधानसभेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे पहिल्यांदाच शिर्डीला आल्यानं शिर्डीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, राजेंद्र गोंदकर, सचिन तांबे यांनी त्यांचं स्वागत करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हेही वाचा -