पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यानंतर खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देत टीका केली. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (दि.२५) शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाचं समर्थन केलं. यावेळी ते म्हणाले, "मी जेव्हा पक्षात होतो तेव्हा माझ्याकडंही तेव्हा संपर्क प्रमुखांनी शहराध्यक्ष पदासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली होती.
संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीनं पुण्यातील अलका चौक इथं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
...तर राऊतांना शहरात फिरू देणार नाही : आंदोलनावेळी शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, "संजय राऊत यांनी आमच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबाबत जे विधान केलं आहे, ते फक्त नीलम गोऱ्हे यांच्याबाबत नसून तो महिलांचा अपमान आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. भविष्यात त्यांनी जर असं विधान केलं तर, त्यांना शहरात फिरू देणार नाही. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करू."
माझ्याकडं २५ लाखांची मागणी : "मी जेव्हा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) होते. तेव्हा संपर्क प्रमुखांनी माझ्याकडं शहराध्यक्ष पदासाठी २५ लाखांची मागणी केली होती. तेव्हा, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क प्रमुख बाळा कदम होते. तेव्हा त्यांच्या चेल्यांनी माझ्याकडं २५ लाखांची मागणी केली होती. तेव्हा जे काही चालायचं, ते आम्हाला माहिती आहे. यावर आम्हाला जास्त बोलायला लावू नका." असं म्हणत भानगिरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.
हेही वाचा :