शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील तलाठी कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालयात राज्यातील पहिलं 'क्यू आर कोड वाचनालय' (State first QR Code Library) सुरू करण्यात आलय. मंडळ अधिकारी डॉ. मोहसिन शेख यांच्या संकल्पनेतून हे वाचनालय साकारण्यात आलय.
विनामूल्य पुस्तकं वाचता येणार : या वाचनालयामुळं महसूल निगडीत कामांसाठी ई बुक द्वारे मार्गदर्शन तसंच वकील आणि पुस्तक खरेदीवर होणारा खर्च, शिवाय वेळेची देखील बचत होणार आहे. त्यामुळं शेख यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातय. डॉ. मोहसिन शेख यांनी या अगोदर देखील महसूल अर्धन्यायिक निकालपत्रात 'क्यू आर कोड'चा वापर, यावर नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केला होता. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासन राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कारात प्रथम क्रमांक मिळाला होता.
महसूल विभागाशी संबधित पुस्तकं विनामूल्य उपलब्ध झाल्यानं वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे. महसूल संबंधित पुस्तकं आता एका क्यू आर कोडच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवर वाचता तसंच डाऊनलोड करता येतील - डॉ. मोहसिन शेख, मंडळ अधिकारी
महसूल विभागाशी संबधित पुस्तकं वाचता येणार : राहाता मंडळ अधिकारी कार्यालयानं सुरू केलेल्या 'क्यूआर कोड वाचनालय' या संकल्पनेमुळं सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि वकील यांना मोठा फायदा होणार आहे. या डिजिटल वाचनालयात महसूल विषयक वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरे, तालुका स्तरीय समित्या, माहिती अधिकार कायदा, तलाठी मार्गदर्शिका, ऑनलाईन ७/१२ आणि महसूल क्षेत्राशी संबंधित पुस्तकं समाविष्ट आहेत. या उपक्रमामुळं महसूल विषयक किचकट कायदे सोप्या भाषेत नागरिकांना समजणं सुलभ होणार असून मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून सहज माहिती मिळवता येणार आहे. तसंच, नागरिकांना आवश्यक त्या पुस्तकांची प्रिंट काढून ती संग्रही ठेवण्याचीही सुविधा मिळणार आहे. हा उपक्रम महसूल प्रक्रियेला सुलभ, पारदर्शक आणि अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे.
हेही वाचा -