पुणे - बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलीय. यावर आता उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, मी सरकारचे आभार मानतो की, माझी या प्रकरणात नियुक्ती केलीय. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जे माझ्या नियुक्तीबाबत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय ते पाहून मी काल मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, हा खटला चालवायला मी तयार आहे. माझं ग्रामस्थांना आवाहन आहे की, जे काही आंदोलन त्यांनी सुरू केलंय, ते त्यांनी आता मागे घ्यावं, असंही यावेळी उज्ज्वल निकम म्हणालेत.
या आधी देखील विरोधी पक्षाचे वकील राजकारणात होते : उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर विरोधक सरकारवर टीका करीत आहेत. याबाबत निकम यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटतील, याची मला आधीच खात्री होती आणि याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं देखील होतं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, राजकारणात या आधी देखील विरोधी पक्षाचे वकील राजकारणात होते. मी जरी राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यामध्ये कोणीही आडवा येऊ शकत नाही. विरोधकांच्या आरोपाला काहीच महत्त्व देत नाही, असंही यावेळी निकम म्हणाले.
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण लावून धरणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचं आज जाहीर केलंय. याबाबतचं पत्र कायदा आणि न्याय विभागाच्या सेक्शन अधिकारी वैशाली बोरुडे यांच्या सहीनिशी काढण्यात आलं. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल माध्यमातील अकाऊंटवर शेअर करत याबाबतची माहिती दिली. त्यांच्यासह बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा :