अमरावती : तालुक्यातील सिमुरी या गावातील 21 दिवसांच्या बाळाला हृदयाचा त्रास असताना त्याच्यावर घरगुती उपाय म्हणून लोखंडी विळा गरम करून त्या गरम विळ्यानं एकूण 65 वेळा बाळाच्या पोटाला चटके देण्यात आलेत. अंगावर शहारे आणणारी ही गंभीर घटना मेळघाटात चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सिमोरी या गावात घडलीय.
अशी आहे घटना : सिमोरी गावातील रहिवासी राजू दिकार यांचे 22 दिवसांचे बाळ आजारी असल्यामुळं घरगुती उपचार म्हणून नातेवाईकांनी बाळाच्या पोटावर गरम विळ्यानं 65 वेळा डम्मा अर्थात चटके दिले. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली. यानंतर त्याच्या पालकांनी त्याला उपचाराकरिता हातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. बाळाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या ठिकाणी डॉक्टरांनी बाळावर प्राथमिक इलाज करून त्याला तात्काळ अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी रात्री 11 वाजता उपचारासाठी हलवलं. सध्या बाळावर उपचार सुरू असून, त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय.
वडील म्हणतात चटके कोणी दिले माहिती नाही : बाळाचा जन्म 3 फेब्रुवारीला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात झाला. पाच फेब्रुवारीला बाळाला घरी नेल्यावर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं लक्षात आलं. बाळाच्या पोटावर चटके कोणी दिले हे मला माहिती नाही. आमच्या घरात एक कार्यक्रम सुरू होता आणि मी बाहेर होतो. बाळाच्या पोटावर कुणीतरी चटके दिल्यामुळे सोमवारी त्याला आम्ही दवाखान्यात आणलं, अशी माहिती बाळाचे वडील राजू धिकार यांनी दिली.
बाळाला हृदयाचा त्रास : बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय. त्याची प्रकृती गंभीर आहे. बाळाला हृदयाचा काही त्रास असावा, बाळाचं हृदय व्यवस्थित वाढलं नाही. आता बाळाला जो त्रास होतोय, त्या दिशेनं बाळावर उपचार केले जातील, अशी माहिती डॉ. अभिलाष चव्हाण यांनी दिलीय. काही सुविधा आपल्याकडे नाहीत. हृदयरोगतज्ज्ञ आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे गरज भासल्यास बाळाला दुसऱ्या ठिकाणी हलवले जाऊ शकतं. आता तपासणीचे काही अहवाल समोर आल्यानंतरच योग्य ते निर्णय घेतले जातील. बाळाला चटके देणे हे चुकीचं आहे. या बाळाचा इलाज शस्त्रक्रियाच आहे. शस्त्रक्रियेची सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही. गरज भासल्याच्या बाळाला योग्य ठिकाणी हलविले जाईल. बाळाला दिलेल्या चटक्यांचा त्रास काही दिवसांत कमी होईल, मात्र बाळाला श्वास घेण्यासाठी होणारा त्रास हा गंभीर आहे. आता काही वेळात अहवाल आल्यावर त्याला उपचारासाठी नागपूरला हलविले जाणार आहे, अशी माहिती देखील डॉ. अभिलाष चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा :