पुणे : शहरात गेल्या काही दिवसापासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी 8 पथकं रवाना केली आहेत.
सुप्रिया सुळे यांची मागणी : स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृह खात्याला यश आलेलं नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचं उदाहरण आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया - राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यग्र असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण? : याबाबत अधिक माहिती अशी, "एक 26 वर्षीय तरुणी पुण्यावरुन फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली. यावेळी संशयित आरोपीनं तिला बस तिकडं लागली आहे, असं सांगून बसमध्ये नेलं. यावेळी नराधमानं बसमध्येत तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरुन पोबारा केला. हादरलेल्या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळखही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय? : "पीडित मुलगी पुण्यात काम करते. ती सोमवारी पहाटेच्या सुमारास फलटणला जात होती. सकाळी साडेपाच पावणेसहाच्या दरम्यानची ही घटना आहे. पीडिता ही बससाठी थांबली असताना आरोपी तिच्याकडं गेला होता. आरोपीनं गोड बोलून या मुलीशी ओळख करून घेतली आणि कुठे जात आहे असं विचारलं. इथे बस लागत नसून दुसरीकडं लागत असल्याचं आरोपीनं सांगितलं आणि तिला स्वतः सोबत नेलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्या आरोपीसोबत जाताना दिसत आहे. बसमध्ये अंधार असल्यामुळं तरुणीला संशय आला पण आरोपीनं तिला गोड बोलून बसमध्ये चढायला सांगितलं. त्यानंतर तरुणीवर अतिप्रसंग केला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर ती मित्राशी बोलली त्यानंतर तिनं स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास केला असता ही बाब पुढे आली आहे", अशी माहिती स्मार्तना पाटील यांनी दिली.
आरोपीचा शोध सुरू : "पोलिसांचं पेट्रोलिंग चालू असतं परंतु, पोलीस प्रत्येक बस चेक करत नाहीत. हा सगळा प्रकार झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली. तिथेच हा सगळा प्रकार लक्षात आला असता तर तिला सगळ्यांनी मदत केली असती. तरुणीची तब्येत नीट आहे आणि ती हे पोलिसांशी देखील व्यवस्थितरित्या बोलली. स्वारगेटच्या आगार प्रमुख यांच्याशी आमचं काहीही बोलणं झालं नाही. आम्ही आरोपी कुठे पसार झाला याची माहिती घेत आहोत. ती बस सिक्युअर करून ठेवलेली आहे. मुलीची मेडिकल करून घेणार आहे तिचं मानसिक स्वास्थ आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सीसीटीव्हीमध्ये अनेक लोक दिसत आहेत. ड्रायव्हर देखील दिसत आहेत", असं पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या.
ही घटना खूप निंदनीय : यावर आत्ता लोकप्रतिनिधींकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "स्वारगेट सारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा पद्धतीची जर घटना होत असेल तर हे खूप निंदनीय आहे. या संदर्भात जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.
रूपाली चाकणकर काय म्हणाल्या? : पुणे विद्येचे माहेरघर असून अनेक गाव खेड्यातल्या मुली येथे शिक्षणासाठी येत असतात. किंबहुना पुणे हे कायम सुरक्षित राहिलं असून शिक्षण घेण्याच्या अनुषंगानं ही हे शहर तरुणींना सुरक्षित वाटत आलं आहे. मात्र, काल घडलेली स्वारगेटमधील घटना ही अतिशय धक्कादायक आहे. सकाळच्या सुमारास सहा-साडेसहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून मुलीवर अत्याचार करून आरोपी हा फरार झाला आहे. नऊ वाजताच्या सुमारास यातील पीडित तरुणीने पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास सुरू केला. तसंच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तरुणीनं केलेल्या आरोपीच्या वर्णनांच्या अनुसार आरोपीचा शोध घेतला जात आहे. यातील आरोपीच्या तपासासाठी आठ पथके नेमण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे आणि आसपासच्या ग्रामीण भागातही तपास सुरू आहे. तसंच आरोपीचा सीडीआर देखील काढण्यात आला असून याआधी देखील त्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये : तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सतर्क राहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीचं समुपदेशन आणि जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
हेही वाचा -