मुंबई- राज्य सरकारने पालकमंत्रिपद शनिवारी जाहीर केलंय. मात्र काही तासांतच नाशिक आणि रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद रद्द करावं लागलंय, याबाबत सरकारने जीआर काढलाय. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून रास्ता रोको आणि जाळपोळ करण्यात आलीय. दरम्यान, पालकमंत्रिपदासाठी महायुतीत हावरटपणा सुरू आहे. पालकमंत्रिपद स्थगित करण्याचे कारण काय? जाळपोळ करून पालकमंत्रिपद मिळत असेल तर चुकीचं आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलीय. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री कसे सहन करतात? : पालकमंत्रिपदासाठी टायर जाळले जातात, रास्ता रोको होतो. रस्ते अडवले जाताात. मग ईव्हीएमच्या बहुमतामुळं आलेले सरकार आणि हे सगळं मुख्यमंत्री सहन कसे करताहेत? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. मंत्र्यांचा स्वार्थीपणा बरा नाही. भरत गोगावलेंचे नाव न घेता आदित्य ठाकरेंनी भरत गोगावलेंवर पालकमंत्रिपदावरून टीका केलीय. नाशिक, रायगड पालकमंत्रिपदावरून सरकारमध्ये वाद सुरू आहेत. गोंधळ सुरू आहे. यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून वाद सुरू आहे. पहिल्यांदा तिकीट वाटप, मंत्रिपद आणि आता पालकमंत्रिपदावरून यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मग हे लोक जनतेची काम करणार कधी? त्यांना न्याय देणार कधी? अशी टीका आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर केलीय. पालकमंत्रिपदावरून मुख्यमंत्री हतबल आहेत. मुख्यमंत्री एवढे का सहन करताहेत माहीत नाही. स्वार्थापोटी यांच्यात वाद सुरू आहेत. एका एका मंत्र्यांला तीन-तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद दिलंय. त्यांना जिल्ह्याचे मालक व्हायचे आहे. मालकमंत्री व्हायचे आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केलीय.
...मग एकही आरोपी सुटणार नाही : बीड प्रकरणात गृहखात्याने पोलिसांना मुभा दिली तर एकही आरोपी सुटणार नाही. पण गृहखाते आणि सरकारची इच्छा असेल तर, नाहीतर आरोपी मोकाट फिरतील. पोलिसांना मोकळं मैदान दिलं तर कोणी सुटणार नाही. वाल्मिक कराडला शरण यावे लागले. सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीला पोलिसांनी पकडलंय. याबद्दल पोलिसांचे अभिनंदन आणि त्यांचे कौतुक करावे लागेल. आरोपी बांगलादेशी आहे, मग बांगलादेशी भारतात घुसतात कसे? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.
भाजपा सरकारचे अपयश : मध्यंतरी बांगलादेशी हटाव मोर्चा काढण्यात आलेला होता. सध्या देशात घुसखोरी सुरू आहे, हे केंद्रातील भाजपाचे अपयश आहे. एकीकडे चीनची घुसखोरी तर दुसरीकडे बांगलादेशी घुसतात. मग केंद्रात गृहमंत्री आणि केंद्रात सरकार कोणाचे आहे. भाजपाला केंद्रात सरकारला 10 वर्ष झालीत. तरीसुद्धा मग घुसखोरी का थांबत नाहीये? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय. आपण पंतप्रधानाना विचारले पाहिजे की, तुमच्या सरकारच्या काळात ही घुसखोरी होते कशी?. मुंबईत किती बांगलादेशी अनधिकृत राहतात आणि किती अधिकृत राहतात याची आकडेवारी मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे आणि त्याच भाजपाच्या राज्यात बांगलादेशी घुसखोरी करून हल्ले करताहेत, हे भाजपाचे अपयश आहे, याचे तुम्हीच मोजमाप करू शकता, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी भाजपावर केलाय.
एन्काऊंटर राजकीयदृष्ट्या होता? : बदलापूर घटनेवर कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. निवडणुकीपूर्वी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केलाय. या सरकारला काहीतरी विषय पाहिजे होता. म्हणून असे केले आहे का? हा एन्काऊंटर राजकीयदृष्ट्या होता का? किंवा याच्या मागे काही गुपित होते का? पण आता हा विषय कोर्टात असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.
नाराज होऊन गावी कोण गेलंय? : दरम्यान, सध्या दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री आहेत. दावोसा दौरा यशस्वी व्हावा. या दौऱ्यातून रोजगार निर्मिती आणि नोकऱ्या निर्माण व्हावात. शेवटी सत्ताधारी किंवा विरोधक असो त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला पाहिजे. दुसरीकडे उदय सामंत नाराज आहेत, असा प्रश्न ठाकरेंना विचारला असता, मला त्यांच्या राजकारणात जायचे नाही. मात्र नाराज होऊन गावी कोण गेलंय? असं पण मला माहीत पडलं, हे खरे आहे का? असा मिश्कील सवाल यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदेंचं नाव न घेता उपस्थित केलाय. दरम्यान, महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होते. त्याचे काय झाले? यावरूनही आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केलीय.
हेही वाचा -