मुंबई- न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भुवान याला अटक केलीय. भुवानची गुरुवार आणि शुक्रवारी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान, बँकेचा सरव्यवस्थापक हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांची पोलीस कोठडी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आलीय. याशिवाय भुवान याचीही 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना 122 कोटी रुपये कमी आढळून आलेत : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील रोख रकमेच्या तपासणीदरम्यान आरबीआयच्या अधिकाऱ्यांना 122 कोटी रुपये कमी आढळून आलेत. ही रक्कम मेहता याने घेतल्याचा आरोप आहे. तशी कबुली दिल्याचा व्हिडीओदेखील आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केलाय. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरबीआयकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करून हा पुरावा तसेच इतर कागदपत्रे मागितली आहेत. या घोटाळ्याप्रकरणी बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भुवान याला अखेर अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. भुवान हा 2019पासून पाच वर्षे बँकेचा सीईओ होता. गुरुवारी आणि शुक्रवारी चौकशी करून त्याचा जबाब नोंदविण्यात आला. गुन्ह्यामध्ये त्याची भूमिका असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तिसरा आरोपी उन्नथन अरुणाचलम उर्फ अरुणभाई हा अजूनही फरार असून त्याचा शोध घेण्यात येतोय.
पाच वर्षे ऑडिट केले, तरीही... : आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँकेचे इंटर्नल ऑडिट करणाऱ्यांनी गेली पाच वर्षे ऑडिट केलंय. मात्र, त्यांना 122 कोटी रुपयांची रोख रक्कम गायब आहे, हे कसे कळू शकले नाही, याचाही तपास करण्यात येत आहे. याच दृष्टीने 2019 ते 2021 या कालावधीत बँकेचे ऑडिट करणाऱ्या अभिजीत देशमुख या सीएचा जबाब नोंदविण्यात आलाय. विशेष म्हणजे आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर प्रशासकाच्या मदतीसाठी ज्या सल्लागारांची नियुक्ती केली, त्याच अभिजीत देशमुख यांचाही समावेश करण्यात आला आहे.
आयसीएआयकडून घेणार माहिती : अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑडिट करताना बॅलन्स शीटमध्ये नोंदविलेली रोख रक्कम आणि प्रत्यक्ष तिजोरीत असलेली रक्कम, याचा ताळेबंद जुळला पाहिजे. याची ऑडिट करणाऱ्यांनी जुळवणी करायची असते. मात्र, या मुद्द्याची आम्ही सीएची संघटना "आयसीएआय"कडून खातरजमा करून घेत आहोत. याशिवाय प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेच्या व्हॉल्टमध्ये मोठी रक्कम ठेवण्यासाठी पुरेसी जागा आहे का, हेदेखील तपासण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले.
मेहता सांगायचा, पैसे काढून आणा : बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना हितेश मेहता कॉल करून 50 लाख रुपये काढून त्याने पाठविलेल्या व्यक्तीकडे सोपविण्यास सांगत होता, अशी माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली असून, त्याचा जबाब नोंदविण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :