मुंबई : महावितरणची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 5 ते 10 टक्के दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरणच्या वीज दर निश्चितीबाबतच्या प्रस्तावावर येत्या मंगळवारी (25 फेब्रुवारी) नवी मुंबई येथील सिडको भवन येथे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर सुनावणी होईल. त्यामुळं आधीच महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा मोठा शॉक लागणार असल्यानं त्यांचे दर महिन्याचं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
ज्या ग्राहकांचा विजेचा वापर 100 युनिट पर्यंत असेल त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल. मात्र, त्यापेक्षा जास्त वीज युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे महावितरणनं व्हेरिएबल चार्ज न वाढवल्याचा दावा केलाय. मात्र, प्रत्यक्षात फिक्स चार्ज 12 ते 15 टक्के वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळं त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
नवीन वीज दर केव्हापासून लागू होणार : महावितरणबरोबर मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांच्या वीज दरात देखील वाढ होणार असल्यानं मुंबईकर ग्राहकांचे एप्रिल-मे महिन्याचे बील 5 ते 10 टक्क्यांनी वाढलेले येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. महावितरणला होत असलेली आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी महावितरण तर्फे पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी हा वाढीव वीज बिलाचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडं सादर करण्यात आलाय. वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर राज्यात 1 एप्रिल पासून नवीन वीज दर लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महावितरणनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडं सादर केलेल्या प्रस्तावात सन 2023-2024 आणि 2024-2025 या कालावधीसाठी शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेची मागणी 35 ते 40 टक्के वाढवून दाखवली आहे. यामुळे वीजेची खरेदी वाढली आणि परिणामी तोटा वाढला, असं महावितरणकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -