अमरावती : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयानं 28 फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आक्षेपार्ह विधान केल्यामुळं नवनीत राणा यांना समन्स बजावलं आहे.
नवनीत राणा यांनी ओवैसींवर केली होती टीका : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 8 मे 2024 ला नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान "ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, या देशामध्ये हे पाकिस्तानच्या ... येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहोत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. 15 सेकंदकरिता पोलीस बंदोबस्त हटवला तर, ओवौसी बंधूंना ते नेमके कुठे आहेत हे कळणार देखील नाही" असं विधान केलं होतं. नवनीत राणांच्या या विधानामुळं खळबळ उडाली होती.
नवनीत राणा यांना नोटीस : याबाबत हैदराबादमधील शादनगरमध्ये त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. हे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप करीत असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबाद न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. ओवैसी यांच्या याचिकेवरून हैदराबाद न्यायालयानं नवनीत राणा यांना 28 फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.
नवनीत राणा न्यायालयात राहणार उपस्थित : हैदराबाद न्यायालयानं पाठवलेली नोटीस स्वीकारल्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहणार असं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात न्यायालयात नेमकं काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :