शिर्डी : शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान भिकारी हटाव मोहीम राबवत आहेत. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तसंच भाविकांना त्रास देणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे 72 भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात सोळा जिल्ह्यातील आणि पाच राज्यातील भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे. काल (दि. २०) सकाळ पासूनच ही मोहीम राबवण्यात आली. यातील महिला भिक्षेकरींची मुंबईतील चेंबूर इथं रवानगी करण्यात आली. तर, पुरुष भिक्षेकरींना विसापूर इथं पाठवण्यात आलं आहे. या कारवाई दरम्यान मुंबईचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक उच्चशिक्षित तरुण भीक मागत असल्याचं समोर आलं आहे.
मोहिमेत आली धक्कादायक माहिती समोर : पोलिसांनी केलेल्या भिकारी धरपकड मोहीमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस मधील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हे भीक मागताना आढळले. ते गेल्या दहा वर्षापासून शिर्डीत वास्तव्यास आहेत. पहिल्यांदा त्यांनी वर्तमानपत्र विकायचं काम केलं. मात्र, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते भीक मागत असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडंच त्यांचं मुंबईतील जुनं घर विकल्यामुळं त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती समोर आली. काल त्यांना भीक मागताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर त्यांची चौकशी करताना ते सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता, व्यसनाधीन झाल्यामुळं त्यांनी नोकरी सोडल्याचं समोर आलं. यानंतर त्यांना विसापूर इथं पाठवण्यात आलं आहे. शिर्डीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबावर अग्नि दुर्घटनेमुळं मोठं कर्ज झालं. नातेवाईकांकडून हातउसणे घेतलेले पैसे परत करण्यासाठी आई, पत्नी आणि लहान मुलगी भीक मागत असल्याचं आढळलं. चेहरा आणि शरीरवर जखमा असल्यानं त्यांना कोणी काम देत नाही. परिणामी कर्ज फेडण्यासाठी ते भीक मागतात.
विदेशी पर्यटकांसोबत इंग्रजीत संभाषण करत मागतात भीक : शिर्डीमध्ये देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. इथं आलेल्या परदेशी भाविकांसोबत इंग्रजीत संभाषण करून भीक मागताना काहीजण आढळून आलेत. ते भाविकांना शिर्डीची माहिती इंग्रजीमध्ये देऊन त्यांच्याकडून पैसे घेतात. अशा कामातून पैसे मिळवून ते व्यसनाधीन झाले आहेत. यामुळं पोलीस ही मोहीम अधिक तीव्र करणार आहेत. मोहीमेत सापडलेल्या सर्व भिकाऱ्यांची नावनोंदणी करत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसंच न्यायालयाच्या आदेशानं पुरुषांना विसापूर तर, महिलांची चेंबुर इथल्या भिक्षेकरी गृहात रवानगी केली आहे.
हेही वाचा :