मुंबई– गेल्या काही दिवसांपासून बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळताहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे विषयांवर पालिका आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्वतः राज ठाकरे यांनी दिलीय.
मुंबईतील मूर्तिकारांनी देखील विचार करावा : मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागील दोन वर्षांपासून पालिका शाडूच्या मातीचे गणपती बनवण्यासाठी मुंबईतील कारखानदारांना सातत्याने आवाहन करीत आहे. अशातच यावर्षीच्या माघी गणेशोत्सवात झालेल्या गोंधळामुळे हे प्रकरण सध्या तापलं आहे. या संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "याचा आता मुंबईतील मूर्तिकारांनी देखील विचार करायला हवा. राज्य सरकारचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही बदल करायला हवा. दरवर्षी हा मुद्दा चर्चेला येतो. यावर दरवर्षी काय भूमिका घ्यायची प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण मोठे आहे. त्यामुळे यावर आता मूर्तिकारांनी निर्णय घ्यायला हवा," अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही : आयुक्तांशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आजघडीला बृहन्मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी तशी फारशी चांगली नाही. अशात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीखालून विविध कंपन्यांच्या मोठ्या प्रमाणात केबल जात आहेत. यात रिलायन्स, टाटा, अदानी यांसह विविध सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून भूमी वापराच्या बदल्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोणताही महसूल मिळत नाही. या कंपन्यांकडून महानगरपालिका पैसे का घेत नाही? हा माझा प्रश्न आहे. तो मी आयुक्तांना विचारला. त्यावर हा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे आयुक्तांनी सांगितले."
याबाबतचे पत्र आयुक्त राज्य सरकारला पाठवणार : पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "महानगरपालिकेचे पैसे इतरत्र जाऊ नयेत अशीच आमची इच्छा आहे. आमच्या झालेल्या चर्चेनुसार आता याबाबतचे पत्र आयुक्त राज्य सरकारला पाठवणार आहेत. जीएसटी आल्यापासून ऑक्ट्रॉय बंद झाला आणि त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडला आहे. आज सरकार सर्वांनाच कर लावत चाललं आहे. सर्वांनाच सर्व कर आहेत. मग, या कंपन्यांना कर का नाही? या काही धर्मादायी संस्था आहेत का? या सर्व कंपन्या त्यांचा नफा कमवत आहेत. याचा महसूल पालिकेला केला का मिळू नये? हा राज्य सरकारचा निर्णय असल्याने यानंतर मी मुख्यमंत्र्यांची देखील या संदर्भात हे घेणार आहे," अशी माहिती राज ठाकरे यांनी दिलीय.
पालिकेच्या रुग्णालयांचा विषय महत्त्वाचा : या भेटीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांशी आणखी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. तो म्हणजे पालिकेच्या रुग्णालयांचा विषय आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने मुंबईतील आरोग्य सेवा विस्कळीत होते. त्याचा ताण पालिकेच्या आरोग्य विभागावर येतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ही लोक बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभागाला आणि रुग्णालयांना वेगळे काही पैसे देतात का? त्यांच्या राज्यातील, त्यांच्या भागातील पालिका रुग्णालयांमध्ये ही लोक का जात नाही. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील लोकांचा प्रश्न नाही. पण, परराज्यातून येणाऱ्या लोकांचे काय? हा मुद्दा आहे. या लोकांसाठी वेगळ आरोग्य शुल्क आकारले जावे. या विषयावर आयुक्तांची चर्चा केली," असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :