अमरावती : सातपुडा पर्वतरांगेनं वेढलेल्या जंगलाचा घनदाट परिसर आणि या परिसरात ऐतिहासिक अशी षटकोनी आकाराची विहीर चिखलदरा तालुक्यात बदनापूर आणि सोलामोह या दोन गावांच्या मध्ये आहे. ही विहीर पूर्णतः लाकडावर उभारण्यात आली असल्याचं दिसतं. हेच या विहिरीचं वैशिष्ट्य असून लाकडाची ही विहीर दगडांनी बळकट करण्यात आली. ही केवळ पाण्याचा साठा असणारी विहीर नाही तर सैन्य छावणीचं एखादं ठिकाण असावं असा अंदाज इतिहास अभ्यासक व्यक्त करतात. मेळघाटच्या जंगलातील या ऐतिहासिक (Historic Well) आणि दुर्लभ विहिरीसंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
अशी आहे विहीर : बदनापूर गावालगत पडक्या अवस्थेत अतिशय जुनी विहीर या भागात येणाऱ्यांचं लक्ष वेधते. पूर्वी या विहिरीच्या परिसरात सोलामोह नावाचं गाव होतं. ते आता दुसरीकडं वसलं. ही विहीर ज्या ठिकाणी आहे ती जागा बदनापूर या गावातील रहिवासी शेषराव पाथरे यांच्या मालकीची आहे. दुरून पाहिलं तर पडक्या अवस्थेत दिसणारी ही विहीर जवळून पाहिली तर जमिनीमध्ये एखादं तळघर भासावं असं या विहिरीचं स्वरुप पाहायला मिळतं. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. चौकोनी आकार असणाऱ्या या विहिरीला चारही बाजूंनी दगडांची तटबंदी होती. आज एका बाजूची तटबंदी पडली असून त्या ठिकाणी मोठी काटेरी झुडूपं वाढली आहेत. विहिरीच्या दोन बाजूंनी दोन छानशा छोट्या खोल्या या ठिकाणी आढळतात. या खोल्यांना विहिरीच्या दिशेनं असणाऱ्या इराणी शैलीच्या दारातून विहिरीतील पाण्याचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं.
सतीशिळा पाहताना आढळली विहीर : गड आणि किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे हे या परिसरात असणाऱ्या सतीशिळेसंदर्भात माहिती घेण्याकरता चार वर्षांपूर्वी आले होते. या परिसरात सती शिळा आढळून आल्यावर सती शिळेपासून काही अंतरावरच ही पडकी विहीर त्यांना दिसून आली. "ही विहीर आम्ही पहिल्यांदा पाहिली तेव्हा अगदी थक्क झालो. मेळघाटात असणारा गाविलगड किल्ला आणि नरनाळा या दोन्ही किल्ल्यांशी या विहिरीचा संबंध असावा असं आमच्या लक्षात आलं. या विहिरीसाठी जो दगड वापरण्यात आला, तो दगड गाविलगड किल्ल्यावर आढळतो. या विहिरीत उतरण्याकरता एक मार्ग असून विहिरीच्या आतमध्ये प्रदक्षिणा घालण्याकरता ओटा आहे. बसण्याकरता देवडी अर्थात एक छोटी खोली दोन्ही बाजूला आहे" असं शिवा काळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
गाविलगड किल्ल्याचा हा जुना मार्ग : आज गाविलगड किल्ला ज्या भागात आहे त्या ठिकाणी पूर्वी जाण्याकरता जंगलातून एक वेगळा मार्ग होता. अचलपूरवरून थेट गाविलगड आणि नरनाळाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं. या विहिरीलगत सैन्याची राहुटी कदाचित असायची. यासोबतच या परिसरात पाण्याच्या व्यवस्थापनाकरता त्यावेळी ही विहीर बांधण्यात आली असावी असा अंदाज शिवा काळे यांनी व्यक्त केला.
बहमनी शासन काळातली विहीर : मेळघाटात चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि अकोट तालुक्यात येणारा नरनाळा किल्ला या ठिकाणी 1425 च्या दरम्यान बहामनी शासन होतं. त्यावेळी फिरोजशहा बहमनीच्या काळात त्याचा भाऊ अहमदशाह बहमनी यानं या परिसरात पाण्याच्या व्यवस्थापनाकरिता अनेक प्रकल्प त्याकाळी राबवले. त्या अंतर्गतच मेळघाटात गाविलगड किल्ल्याला जाणाऱ्या जुन्या मार्गावर असणारी ही विहीर देखील 1425 ते 1430 दरम्यान बांधली असावी असा अंदाज इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी व्यक्त केला. या विहिरीच्या बांधकामामध्ये इराणी शैली, हिंदू शैली आणि दक्षिण भारतातील तत्कालीन मुस्लिम शैलीचा प्रभाव आढळून येतो असं देखील प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणाले.
लाकडी बांधकामाचं असं आहे वैशिष्ट्य : मेळघाटातील दुर्गम भागात असणारी ही विहीर लाकडी बांधकामावर उभी आहे. लाकडाचं हे बांधकाम 400 ते 500 वर्ष टिकणारं असतं. ताजमहाल बांधणारा अभियंता कासिम खान यानं ताजमहाल देखील लाकडी ओट्यावरच साकारला. लाकडाच्या बांधकामाचं आयुष्य दीर्घकाळ टिकणार आहे असा उल्लेख स्वतः कासिम खान यानं केला. ताजमहाल आणि ह्या विहिरीची तुलना अजिबात होत नाही. मात्र ही विहीर देखील स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे असं प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणाले.
उन्हाळ्यात आटते विहीर : "खाली चौकोनी वर षटकोनी आकाराची असणारी ही विहीर पूर्वी कधीही आटायची नाही. आता या भागात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात शेती करत असल्यामुळं अनेक ठिकाणी बोअर खोदण्यात आली. त्यामुळं उन्हाळ्यात ही विहीर आता आटायला लागलीय. आमच्या शेतात असणारी ही ऐतिहासिक आणि जुनी विहीर नेमकी कोणी आणि कधी बांधली याबाबत काहीही माहिती नाही. ही विहीर मात्र लाकडावर बांधण्यात आली" अशी माहिती या विहिरीचे मालक शेषराव पाथरे यांनी दिली.
हेही वाचा -