मुंबई Ravi Shastri : मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमनं रविवार, 19 जानेवारी रोजी आपला 50वा वर्धापन दिन भव्य थाटामाटात साजरा केला. या खास प्रसंगी अनेक संस्मरणीय क्षण होते, त्यापैकी एक म्हणजे क्रिकेटचे दिग्गज रवी शास्त्री यांनी त्यांच्या खास भाष्य शैलीत त्यांनीच मारलेल्या ऐतिहासिक 'सहा षटकार' घटनेची आठवण करुन दिली.
The celebration felt a little incomplete without the trademark Ravi Shastri commentary 😉#Wankhede50 | #MCA | #Mumbai | #Cricket | @RaviShastriOfc pic.twitter.com/QSeiKljuXS
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) January 19, 2025
रवी शास्त्रींनी मारले होते सहा षटकार : 1985 मध्ये, मुंबई आणि बडोदा यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यात, रवी शास्त्री यांनी एका षटकात सहा षटकार मारले जो क्रिकेट इतिहासातील एक विक्रम ठरला. शास्त्रींनी बडोद्याचा गोलंदाज तिलक राजच्या गोलंदाजीवर हा कारनामा केला होता. विशेष म्हणजे त्या सामन्यात शास्त्रींनी द्वीशतकही केलं होतं. शास्त्रींच्या या कामगिरीमुळं मुंबईला त्या हंगामात त्यांचा 30वा रणजी करंडक जिंकण्यास मदत झाली.
स्वतःच केली कॉमेंट्री : या संस्मरणीय क्षणाची आठवण करुन देताना शास्त्री म्हणाले, "जेव्हा मी सहा षटकार मारले तेव्हा ना टीव्ही होता ना समालोचन. पहिला सिक्स त्या दिशेनं गेला. त्या दिशेनं दुसरा. तिसरा चेंडू मिड-विकेटला. तो एक चांगला गोलंदाज होता, म्हणून त्यानं चौथा चेंडू लेग-स्टंपवर टाकला. मग मी त्याला गावस्कर स्टँडमध्ये पाठवलं. तर पाचवा हॉकी मैदानाच्या दिशेनं आणि नंतर सहावा..." त्यानंतर रवी शास्त्री उभे राहिले आणि त्यांनी शेवटच्या चेंडूवर त्यांच्याच शैलीत भाष्य केलं. शास्त्री पुढं त्यांच्या समालोचनात म्हणाले, "तिलक राज गोलंदाज. फलंदाज रवी शास्त्री स्ट्राईकवर. लाकडासारखा कठीण. अमरनाथ कव्हरमध्ये. यष्टींमागे किरण मोरे सावध. राज गोलंदाजी करतो, हा फ्लॅट सिक्स, स्कड क्षेपणास्त्रासारखं, चेंडू लांब पलीकडे जातो आणि पार्टी मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये सुरु होते. 10 जानेवारी 1985"
रवी शास्त्री यांचं योगदान आणि वानखेडेचा ऐतिहासिक क्षण : हा कार्यक्रम केवळ वानखेडे स्टेडियमच्या 50 वर्षांच्या उत्सवाचा नव्हता तर भारतीय क्रिकेट इतिहासातील त्या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणारा होता. ज्यांनी क्रिकेटला जगातील सर्वात महान खेळांपैकी एक बनवलं. शास्त्री यांनी सहा षटकार मारण्याचा पराक्रम आणि त्या क्षणाचं त्यांनी केलेलं भाष्य यावरुन हे सिद्ध झालं की क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर एक जादू आहे जी नेहमीच लोकांच्या हृदयात राहील.
हेही वाचा :