नवी दिल्ली Delhi Capitals New Coach : माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी आणि वेणुगोपाल राव यांचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या सीझनसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे. हेमांग बदानी हे IPL 2025 मध्ये दिल्लीचे नवे प्रमुख असतील. बदानी यांच्याशिवाय वेणुगोपाल राव यांना क्रिकेटचं संचालक करण्यात आलं आहे. रिकी पाँटिंगच्या जागी बदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिकी पॉन्टिंग 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक बनले. त्याच्या नेतृत्वाखाली, संघानं 2019 आणि 2021 च्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचताना IPL 2020 मध्ये उपविजेतेपद संपादन केलं. पाँटिंग आता पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे.
सौरव गांगुलीच्या जागी नियुक्ती : याशिवाय वेणुगोपाल रावनं सौरव गांगुलीच्या जागी संघात स्थान मिळवलं आहे. वेणुगोपालच्या आधी सौरव गांगुली संघाचे क्रिकेट संचालक होते. वास्तविक, हा संपूर्ण बदल दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांमधील संघ चालवण्याच्या प्रक्रियेमुळं झाला आहे. वास्तविक, आता दिल्ली कॅपिटल्सची कमान दोन वर्षांसाठी जीएमआर समूहाकडं आली आहे. यापूर्वी ते जेएसडब्ल्यूकडे होतं.
कोचिंगचा प्रभावी अनुभव : वेणुगोपालनं भारतासाठी 16 एकदिवसीय सामने खेळले आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससह तीन संघांचं प्रतिनिधित्व केलं. दुसरीकडे, बदानीनं भारतासाठी चार कसोटी आणि 40 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बदानी यांचा कोचिंगचा अनुभव प्रभावी आहे. त्यांनी चेपॉक सुपर गिलीजला प्रशिक्षण दिलं, ज्या संघानं चार वेळा तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) जिंकली, तसंच लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये जाफना-आधारित फ्रँचायझीचे कोचिंग स्टाफ सदस्य म्हणून आणि सनरायझर्स इस्टर्न केपसह फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांनी यश मिळवलं.
31 खेळाडू कायम ठेवण्याची मुदत : खेळाडू कायम ठेवण्याच्या रणनीतीबाबत, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे. संघातील युवा परदेशी खेळाडू फ्रेझर-मॅकगर्क आणि ट्रिस्टन स्टब्स यांना कायम ठेवण्याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. सर्व दहा संघांकडे 31 ऑक्टोबरपर्यंत IPL 2025 मेगा लिलावापूर्वी त्यांचे रिटेन्शन निश्चित करण्यासाठी वेळ आहे, लिलावाच्या तारखा आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही.
हेही वाचा :
- भारतीय संघ 46 धावांत गारद... मात्र न्यूझीलंडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम
- फलंदाजी की थट्टा...? भारतीय संघ 46 धावांत गारद; 92 वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं