मुंबई INDIA Alliance Rally : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचलाय. यातच आज बांद्रा येथील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. महाराष्ट्राच्या पाठीत वार केला तर वाघनखं बाहेर काढून तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलाय.
4 जूनला डीमोदीनेशन करणार : या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "तिकडं सर्व भाडोत्री माणसं, वक्ते भाडोत्री. मी थोडासा रिपोर्ट घेत होतो. 4 जूनपर्यंतचे पंतप्रधान मोदी तिथं बोलायला उभे राहिले. मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला. ज्याप्रमाणे मोदींनी आपल्याला फसवलं, नोटबंदी जाहीर केली आणि सांगितलं. तसंच मोदीजी तुम्ही आज बोलून घ्या. संपूर्ण देश 4 जूनला डीमोदीनेशन करणार आहे. जसं चलनी नोटा कागदाचे तुकडे राहिल्या होत्या. तसं 4 जूननंतर तुम्ही पंतप्रधान राहणार नाही."
थेट पंतप्रधान मोदींना आव्हान : यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत म्हणाले, "तुम्ही उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करुन बघा. हा महाराष्ट्र तुमचं राजकारण इथं गाडून टाकेल. तुम्ही कितीही डोकी आपटा, मात्र माझा एकही मर्द मराठा फुटणार नाही. तुम्ही सगळे गद्दार तिकडं घेत आहात. ऋतू बदलल्यावर पानं झडतात आणि सडतात. तशी ही सडलेली पानं गळायलाच हवी. त्याशिवाय नवीन अंकुर फुटत नाही. भाजप हा कचरा जमाव पक्ष झालाय. ही पहिली निवडणूक अशी आहे, यावेळी मोदींना प्रचाराची दिशाच सापडत नाही. त्यांना वाटत होतं की काहीही केलं तरी देशातील जनता आपलं ऐकेल. मात्र जनतेनं अब की बार भाजपा तडीपार असा नारा दिलाय. माझं घराणं ज्या मातीत जन्मलं, त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. तुम्ही ज्या मातीत जन्मले, तिथं औरंगजेब जन्माला आला. 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात झुंजला, पण नंतर तो आग्रा पाहू शकला नाही. या मातीत तो गाडला गेला. शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. पण गद्दारांची चालते. कल्याणमधून गद्दाराच्या मुलाला उमेदवारी दिली. पण भाजपा वाढवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी दिली नाही. तुमच्या गॅरंट्या आता बस झाल्या. ही लढाई व्यासपीठावर बसलेल्यांची नाही, तर तुमची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :
- विकसीत भारतात ड्रीम सिटी मुंबईचा रोल महत्त्वाचा, इंडिया आघाडीकडे जितके पक्ष तितके पंतप्रधान - नरेंद्र मोदी - lok sabha election
- मोदी सरकार फसवेगिरी करणारं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; मनमाडच्या सभेत शरद पवारांचा घणाघात - Sharad pawar