बीड : खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. याबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याचा ताबा एसआयटीकडं देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराड याचा ताबा घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता काय होईल ? : राज्य सरकारनं मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मकोका’ कायदा बनवलाय. मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.
मकोका कधी लावला जातो ? : गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीनं गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
कोणावर होते मकोका कारवाई ...? : हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोकको लावला जातो. मकोका लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगारानं किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.
मकोका लावण्याची काय आहे प्रक्रिया ? : मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मकोकाअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.
मकोका लागल्यावर काय मिळते शिक्षा ..? : मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकोकाच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही शिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करुन जर गुन्हेगारी करत असाल, तर त्या संदर्भात मकोकाची तरतूद केली आहे.
हेही वाचा :