शिर्डी : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण मुलामा दिला आहे. हैदराबाद इथले साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम करण्यात आलं आहे. यापूर्वी जुलै 2007 मध्येही त्यांच्याच देणगीतून कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान : साईबाबा संस्थान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान मानलं जातं. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात आणि मोठ्या प्रमाणात दानही करतात. मंदिरात आलेल्या देणग्यांमधून अनेक सामाजिक उपक्रम साईबाबा संस्थानच्या वतीनं राबवले जातात. देणगीदार साई भक्त विजयकुमार यांच्यासारख्या अनेक भक्तांनी संस्थानला सोने-चांदीच्या वस्तू दान केल्या आहेत.
जे आहे ते सर्व साईबाबांचं : "विजयकुमार हे अनेक वर्षांपासून साईबाबांचे भक्त आहेत. त्यांनी यापूर्वीही मंदिराला मोठ्या प्रमाणावर दान केलं आहे." अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. "कळसाला देण्यात आलेल्या सुवर्ण मुलामासाठी किती सोनं वापरलं आहे. हे गुप्त ठेवण्यात आलं आहे. हे आहे ते सर्व साईबाबांचं आहे. त्यामुळं याची वाच्यता करणं योग्य नाही" अशी प्रतिक्रिया साई भक्त विजय कुमार यांनी दिली.
विजय कुमार यांनी दिला संस्थानला सल्ला : साई भक्त विजय कुमार यांनी साई संस्थानला विद्युत रोषणाई न करण्याचा सल्ला दिला आहे. तिरुपती बालाजी आणि द्वारकामाई मंदिरांच्या उदाहरणांचा हवाला देत त्यांनी सांगितलं की, "इलेक्ट्रिक बल्बच्या उष्णतेमुळं सुवर्ण मुलामाला तडे जातात. त्यामुळं मंदिर प्रशासनानं ही सूचना गांभीर्यानं घ्यावी. त्यामुळं मंदिराच्या शिखराची झळाळी अधिक वाढेल."
विजय कुमार यांच्या देणगीतून सोन्याचा मुलामा : यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यालाही आतून सुवर्ण मुलामा देण्यात आला होता. 2006 मध्ये साईबाबांच्या समाधी मंदिरातील सोन्याच्या पादुका, सोन्याची झारी आणि फुलपात्र, सन 2008 मध्ये सोन्याची चिलीम, 2010 मध्ये गुरुस्थान मंदिराच्या बाहेरील बाजूस सुवर्ण मुलामा तसंच 2015 मध्ये साई मंदिर परिसरातील शनि मंदिर, गणपती मंदिर आणि महादेव मंदिर या तीनही मंदिराच्या कळसांना सुवर्ण मुलामा देण्याचं काम देणगीदार विजय कुमार यांच्या देणगीतून करण्यात आलं आहे. त्याच बरोबर मार्च 2023 मध्ये साईबाबांचे चावडीतील दोन चांदीचे सिंहासन, नंदादीप, व्दारकामाईचे चांदीचे सिंहासन आणि समाधी मंदिरातील सिंहासन यांना देखील सुवर्ण मुलामा देण्याचं काम त्यांच्या देणगीतून झालंय.
साईबाबा संस्थानच्या वतीनं सत्कार : साईबाबा संस्थानच्या वतीनं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा साईबाबांची मूर्ती व विभुती देऊन आज सत्कार केला. दरम्यान देणगीदार साईभक्त विजयकुमार यांनी साई मंदिराच्या कलशाला सुवर्ण मुलामा देण्यासाठी किती खर्च आला, याबाबत बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा :