नवी दिल्ली: महाकुंभ मेळाव्यातील चेंगराचेंगरीच्या (New Delhi railway station stampede) दुर्घटनेनंतर नवी दिल्लीतही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी असल्यानं हा अपघात झाला असून केंद्रानं चौकशीचे आदेश दिले आहेत.
शनिवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटाला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी मदतकार्य केलं. प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे अचानक रद्द झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना आणि दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी रात्री उशिरा एलएनजेपी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
#WATCH | Stampede at New Delhi railway station | Delhi's caretaker CM & AAP leader Atishi says, " those who lost their lives, their families have been informed. it's a sad incident. our two mlas are here. i have asked hospital management to let our mlas know if any of the victim's… pic.twitter.com/HrsJNgkSd5
— ANI (@ANI) February 15, 2025
कशी घडली दुर्घटना- दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, " १५ जणांना मृतावस्थेत आणण्यात आलं. ही खूप दुःखद घटना आहे. आमचे दोन आमदार येथे आहेत. कोणत्याही पीडितच्या कुटुंबाला कसल्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी आपच्या आमदारांना कळवावे, असे रुग्णालय प्रशासनाला सांगितलं. १५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ४-५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही." डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार दोन रेल्वेला उशीर झाल्यामुळे आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं रेल्वे स्थानकावर खूप गर्दी होती. १५-२० मिनिटांच्या कालावधीत प्रचंड गर्दीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. स्पेशल रेल्वेची घोषणा झाल्यानंतर रेल्वेत जाण्याकरिता प्रवाशांनी गर्दी केल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.
दुर्घटनेची रेल्वे करणार चौकशी- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स मीडियात पोस्ट करून दु:ख व्यक्त केलं. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाल्याचं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे. दुर्घटनेतील सर्वांना मदत करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुर्घटनेनंतर प्रवाशांसाठी चार विशेष गाड्या धावणार आहेत. आणखी काही विशेष गाड्यांची व्यवस्था केली जात आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफचे महासंचालक यांनी रेल्वे स्टेशनवरील परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी रेल्वेने दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचं आदेश दिले आहेत. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा केला.
#UPDATE | A call was received that 15 people had been injured in a stampede-like situation at New Delhi Railway Station. 4 fire tenders at the spot: Delhi Fire Service
— ANI (@ANI) February 15, 2025
More details awaited
पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं दु:ख- नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियातील पोस्ट करून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे दुःख झाल्याचं म्हटलं आहे. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या सर्वांना अधिकारी मदत करत असल्याची माहितीदेखील पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
हेही वाचा-