पुणे- छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित नुकताच "छावा" हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालाय. अतिशय मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाला पसंती मिळत असून, हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि वीरता, विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर प्रचंड अन्याय केलाय. अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता छावा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. या सिनेमाचे निर्माते आणि निर्देशक, अभिनेते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी होतेय, पण इतर राज्य जेव्हा टॅक्स फ्री करतात, तेव्हा जो करमणूक कर आहे, तो माफ करीत असतात. महाराष्ट्राने या आधीच 2017 साली हा करमणूक कर माफ केलेला आहे. तथापि या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे शुभारंभ करण्यात आलाय, यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेसुद्धा उपास्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचा संदेश दिलाय. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही काम करीत आहोत. सकाळी किल्ले शिवनेरीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत होतो, मात्र त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होते म्हणून ते आपापल्या कार्यक्रमाला गेल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आता अपमानित करणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा दाखवू : अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, आता अपमानित करणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा दाखवू. अशा प्रकारे कोणी वागत असेल तर त्यांना सरकार आणि शिवप्रेमी माफ करणार नाहीत. वादविवाद तेव्हा संपू शकतात, ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते. पण ज्याला वादाची किनार असते, ते वाद कधीच संपू शकतं नाही. यापूर्वी देखील अनेक समित्या तयार केल्या होत्या. त्यावर सरकारनं निर्णयदेखील घेतल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा-