मुंबई : दागिन्यांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोरेस पॉन्झी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी एकाला अटक केली आहे. नवी मुंबईतून बुधवारी रात्री लल्लन सिंह (58) नावाच्या संशयिताला अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. टोरेस ज्वेलरीसाठी लल्लननं सुमारे 14 कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
नवी मुंबईतील मॉलमधून लल्लनला घेतलं ताब्यात : आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नवी मुंबईतील एका मॉलमधून लल्लनला ताब्यात घेण्यात आलं. लल्लननं अनेक बनावट कंपन्यांची स्थापना केली. त्या कंपन्यांच्या माध्यमातून टोरेसला आर्थिक मदत करण्यात आल्याचं उघड झालं आहे. लल्लननं 'जस्ट डायल'वर आपल्या कंपन्यांची जाहिरात केली. त्याआधारे 'टोरेस' ज्वेलरीची मालकी असलेल्या प्लॅटिनम हर्न प्रायवेट लिमिटेडनं त्याला संपर्क साधल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आलं. टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं 35 कोटी रुपयांची मालमत्ता तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. त्यात वाहनं, फर्निचर, उपकरणं इत्यादी वस्तूंचा लिलाव करुन गुंतवणूकदारांना 40 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम परत करण्यात येऊ शकते. त्यासाठी न्यायालयाकडं परवानगी मागण्यात आली आहे, अशीही माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.
130 कोटी रुपयांचा चूना : गुंतवणुकीवर जास्त पैसे देण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडं 12 हजार 783 नागरिकांनी तक्रार केली आहे. सुमारे 130 कोटी रुपयांचा चुना लावून आरोपी फरार झाल्याची माहिती तपासात समोर आली. कंपनीनं बल्गेरिया या देशात देखील दुकान थाटल्याचं तपासात उघड झालं. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सध्या याबाबत माहिती घेत असून त्यात तथ्य आढळल्यास त्या देशाच्या कायदा यंत्रणांकडं माहिती पाठवून त्यांची तपासात मदत घेण्यात येईल, असंही सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा :
- टोरेस घोटाळ्यातील आरोपींचे धागेदोरे बल्गेरियापर्यंत,...तर 40 कोटी परत मिळण्याची शक्यता; मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
- टोरेस घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; मुंबई आणि जयपूरसह 13 ठिकाणी छापेमारी, 21 कोटींची बँक खाती गोठवली
- सहा पट परतावा देण्याचं दाखवलं आमिष; टोरेसमध्ये भाजीवाल्यांचे चार कोटी अडकले, काय प्रकरण?