नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावास कागदपत्र फेरफार प्रकरणी दोन वर्षाचा कारवास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली. यामुळं कोकाटे यांच्या मंत्रिपदासह आमदारकी ही धोक्यात आली आहे. मंत्रिपद धोक्यात असल्यानं कोकाटे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्री पदासाठी 'या' मंत्र्यांमध्ये रस्सीखेच : नाशिकमध्ये दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसनं (अजित पवार) दावा केला होता. यात पालकमंत्री पदासाठी माणिकराव कोकाटे हे प्रमुख दावेदार होते. मात्र, त्यांच्यावर झालेल्या न्यायालयीन कारवाईमुळं त्यांचा पालकमंत्री पदाचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, कोकाटे यांच नाव मागं पडल्यानं आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होणार आहे.
...आणि मंत्री महाजन यांचा पत्ता कट : राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची घोषणा झाली. मात्र, त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं विरोध केल्यानं अवघ्या 24 तासात मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. याला आता महिना उलटून देखील पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सात आमदार असल्यानं पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा दावा असल्याचं खुद्द मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं होतं. शिवसेनेनं ही पालकमंत्री पदाबाबत हट्ट केला आहे. तर, भाजपही कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदासाठी आग्रही झाली आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही सुटलेला नाही.
लवकरच तोडगा निघेल : मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असं म्हटलं होतं, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून नाशिक जिल्हा पालकमंत्री बाबत निर्णय घेऊ असं शिंदेंनी म्हटलं.अशात मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या शिक्षेचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, त्याचा परिणाम त्यांच्या मंत्रीपद आणि आमदारकीवरही होऊ शकतो तसेच तो पालकमंत्री पदावरही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना आता पालकमंत्री पद देताना अडचण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरीष्ठ न्यायालयात दाद मागणार : "तुकाराम दिघोळे राज्यमंत्री असताना 30 वर्षांपूर्वी केस रजिस्टर झाली. माझं आणि दिघोळे यांचं राजकीय वैर होतं. यातून त्यांनी सरकारला सांगून केस केली होती. कायद्यानुसार जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निकाल पत्र सविस्तर वाचलं नाही, राजीनामाची मागणी होऊ शकते. एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा मलाही अधिकार आहे. यामुळं मी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे." असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
हेही वाचा :