मुंबई - 2023 च्या जून महिन्यात 'बाईपण भारी देवा' चित्रपट रिलीज झाला आणि मराठी प्रेक्षकांनी आळस झटकून पुन्हा एकदा थिएटरबाहेर रांगा लावल्या. मागील काही वर्षात जे घडलं नव्हतं ते आश्चर्य या मराठी चित्रपटानं करुन दाखवलं. 'सैराट' नंतर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम 'बाईपण भारी देवा'नं आपल्या नावावर केला. या चित्रपटानं ७६.०५ कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती.
पहिल्या दिवसापासून बोलबाला सुरू झालेल्या या चित्रपटात सहा महिला अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची संकल्पना, तगड्या कलाकारांचा अभिनय, दिलखेचक नृत्यं आणि चित्रपटातील गाणी आदींना प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. विशेष म्हणजे समाजातील सर्व वयोगटातील आणि वर्गातील स्त्री-पुरुषांना हा सिनेमा आवडला. याचा अर्थ हा विषय सार्वत्रिक आकर्षणाचा आहे आणि म्हणूनच तो इतर भाषांमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता ठेवणारा आहे. हे नेमकं त्याचं वेळी उद्यमशील निर्माते बोनी कपूर यांनी ओळखलं आणि चित्रपटाचे हक्क घेण्याचा निर्णय घेतला. बोनी कपूर यांनी या चित्रपटाचा दक्षिण भारतीय भाषामध्ये रिमेक करण्याचं ठरवलं आहे.
2023 मध्ये 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट मराठीतील सर्वात अधिक कमाई करणारा ठरल्यानंतर 2024 मध्ये बोनी यांनी याचे हक्क घेण्यासाठी पुढाकार घेतला. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची क्षमता राखत असल्यामुळं याच्या रिमेकसाठी बोनी कपूर यांनी तब्बल 2 कोटी रुपये मोजले असल्याचं समजतंय. आता त्यांच्याकडे तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटाचे रिमेक करण्याचे अधिकार आहेत.
'बाईपण भारी देवा' हा मराठी चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. मराठीतील दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते आणि सुकन्या कुलकर्णी यांच्यासह दीपा परब, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर अशा प्रतिभावान अभिनेत्रींनी यामध्ये अतरंगी बहिणींच्या भूमिका साकारल्या होत्या. भिन्न वय आणि विचारांच्या या भगिणी मंगळा गौर स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र येतात आणि धमाल उडवून देतात, अशी याची कथा होती. पडद्यावरील या बहिणींच्या वेशभूषा, काळा गॉगल घालण्याची आणि नृत्याची स्टाईल खूप लोकप्रिय ठरली. मोठ्या प्रमाणावर महिलांनी थिएटरमध्ये खेचून आणण्याची क्षमता या चित्रपटाच्या संकल्पनेत असल्यामुळेच बोनी कपूर यांनी हा विषय रिमेकसाठी निवडला आहे.
'बाईपण भारी देवा'चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी गेल्या वर्षी या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याची घोषणा केली आहे. 'आईपण भारी देवा' असं याचं शीर्षक असणार आहे. दरम्यान यावर्षी 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या पार्श्वभूमीवर 7 मार्च 2025 रोजी 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -