नागपूर Harsh Dubey Exclusive : रणजी ट्रॉफी 2024-25 चा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि मुंबई क्रिकेट संघात नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात विदर्भानं 80 धावांनी विजय मिळवला आहे. विदर्भाचा गोलंदाज हर्ष दुबेनं संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं सामन्यात एकुण 7 विकेट घेतल्या. सामन्यानंतर त्यानं 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.
Vidarbha Won by 80 Run(s) (Qualified) #VIDvMUM #RanjiTrophy #Elite-SF2 Scorecard:https://t.co/OLdCTWx00s
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 21, 2025
काय म्हणाला हर्ष दुबे : सामना संपल्यानंतर बोलताना फिरकीपटू हर्ष दुबे म्हणाला, "संघाच्या यशात योगदान देतोय याचा आनंद आहे. मी माझ्या गोलंदाजीवर मेहनत घेतली. मला 66 विकेट मिळतील असं वाटलं नव्हतं. बदला नाही, पण हा खेळाचा भाग आहे. समोरच्या संघाला पराभूत करायचं आहे. पहिल्या डावातील आघाडी निर्णायक ठरली. माझं काम चांगली गोलंदाजी करणं आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अंतिम सामन्याचं दडपण नाही, जो त्या दिवशी चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल."
एका सत्रात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज : विदर्भाचा गोलंदाज हर्ष दुबेनं या हंगामात एकुण 9 सामन्यांत 66 बळी घेतले आहेत. यासह सध्या तो रणजी चषकाच्या इतिहासात एका सत्रात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत अव्वल स्थानी आशुतोष अमन आहे, त्यानं 2018/19 च्या हंगामात बिहार कडून खेळताना 8 सामन्यांत 68 विकेट घेतल्या होत्या. तर सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानं 2019/20 च्या सत्रात 10 सामन्यांत 67 विकेट घेतल्या आहे. या सत्रात हर्ष दुबेला आणखी एक सामना खेळायचा आहे, यामुळं त्याला एका सत्रात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. त्याला यासाठी आणखी 3 विकेट घ्याव्या लागतील.
विदर्भानं घेतला पराभवाचा बदला : मागील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना देखील विदर्भ आणि मुंबई यांच्यात खेळला गेला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईनं त्या सामन्यात 169 धावांनी शानदार विजय मिळवला होता. विदर्भाला अंतिम सामना जिंकण्यासाठी 538 धावांची आवश्यकता होती. याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरनं शतक झळकावलं तर, हर्ष दुबेनं 65 धावा केल्या होत्या. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नव्हते. परिणामी मुंबईनं 42व्यांदा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकला होता. आता मात्र विदर्भानं या सामन्यात विजय मिळवत आपल्या मागिल पराभवाचा बदला घेतला आहे.
हेही वाचा :