वॉशिंग्टन : अमेरिकेच्या गुप्तचर संस्था असलेल्या एफबीआयच्या संचालकपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी अमेरिकेच्या सिनेटनं एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची निवड केली. सिनेटनं 51-49 मतांच्या फरकानं त्यांची निवड केली. मात्र त्यांच्या निवडीवर डेमोक्रॅट्स पक्षाच्या नेत्यांनी विरोध व्यक्त केला. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे निष्ठावान असल्यानं ते डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यावर काम करतील. त्यामुळे विरोधकांवर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात येईल, असा आरोप डेमोक्रॅटीकच्या नेत्यांच्या वतीनं करण्यात आला.
काश पटेल डोनाल्ड ट्रम्प यांचे निष्ठावान : एफबीआयच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आलेले भारतीय वंशाचे काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे निष्ठावान असल्याचे मानले जाते. एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती होताच काश पटेल यांनी एफबीआयमध्ये मोठे फेरबदल करण्याची इच्छा व्यक्त केली. अमेरिकेत मागील दोन दशकात राष्ट्रीय सुरक्षेला मोठे धोके वाढले आहेत. गुन्हेगारी वाढल्यानं त्यावर आळा घालण्यासाठी एफबीआयमध्ये फेरबदल करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
डेमोक्रॅट्स सिनेटरचा विरोध : या अगोदर जो बायडन यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना एफबीआयमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.न्याय विभागानं आता 6 जानेवारी 2021 ला झालेल्या अमेरिकेच्या राजधानीत घडलेल्या दंगलीच्या चौकशीत सहभागी झालेल्या हजारो एजंट्सची नावं मागवण्यात आली आहेत. त्यामुळे डेमोक्रॅट्स सिनेटर काश पटेल यांच्या निवडीला विरोध करत आहेत. "मी यापेक्षा वाईट निवडीची कल्पना करू शकत नाही," असं सिनेटर डिक डर्बिन, डी-इलॉय यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. काश पटेल यांची एपबीआयच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केलं. "अमेरिकन नागरिक पारदर्शक आणि न्यायासाठी वचनबद्ध असलेल्या एफबीआयला पात्र आहेत. आपल्या न्यायव्यवस्थेच्या राजकीयीकरणामुळे जनतेचा विश्वास सध्या कमी झाला आहे. संचालक म्हणून त्यांचं ध्येय 'चांगल्या पोलिसांना पोलीस राहू देणं - आणि एफबीआयमध्ये विश्वास पुन्हा निर्माण करणं' असं त्यांनी सोशल माध्यमांवर नमूद केलं आहे.
हेही वाचा :