सिंधुदुर्ग : "ज्या गावात उबाठाचा सरपंच असेल, त्या गावाला निधी देणार नाही, बसा बोंबलत. एप्रिलनंतर यादीच घेऊन बसणार, मग कळेल आपण उबाठामध्ये थांबून किती चूक केली ती. किती ही टीका करा, पण मी माझा पक्ष वाढवणारच, माझ्या नेत्यांना काय ते स्पष्टीकरण देईन, पण निधी देणार नाही, एवढ्यावर ठाम, अशा शब्दात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच पक्षातून निवडणुकी पूर्वी गेलेली घाण पक्षात पुन्हा येणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सावंतवाडी इथं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन पर्व मेळाव्यात ते बोलत होते.
यांची होती प्रमुख उपस्थिती : यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दादा मालवणकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सरचिटणीस महेश सारंग, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, राजन म्हापसेकर, मनोज नाईक, राजन गिरप, चेतन चव्हाण, प्रमोद गावडे, सुधीर दळवी, रविंद्र मडगावकर, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अॅड.परिमल नाईक, उदय नाईक, आदि उपस्थित होते.
उबाठा पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश : यावेळी मंत्री नितेश राणेंच्या उपस्थित शिवसेना उबाठाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. यात मडुरा इथले उल्हास परब, समीर गावडे, सचिन पालव यांच्यासह दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेकांचा यामध्ये समावेश आहे.
महायुतीचा सरपंच नाही त्या गावात निधी नाही : यावेळी मंत्री राणे म्हणाले, "ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही, त्या गावात निधी नाही, हे मी यापूर्वी बोललो आणि आता पण सांगतो. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी बसलो आहोत, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा ते आमच्या याद्या कशा फेकून द्यायचे, मग त्याची परतफेड करावीच लागेल," अशा शब्दांत राणे यांनी इशारा दिला आहे.
सावंतवाडी मतदारसंघावर बाहेरची घाण नको : यावेळी त्यांनी राजन तेली आणि विशाल परब यांना नाव घेता योग्य शब्दात समज दिली. "पुन्हा सावंतवाडी मतदारसंघावर बाहेरची घाण नको. काहीजण आमच्या नेत्यांवर टीका करून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संभाषण व्हायरल करण्याचं धाडस केलं जाते. त्यांना आता सोडायचं नाही, ते पुन्हा पक्षात येण्याचं धाडस करणार नाही आणि आलेच तर त्यांना सोडू नका," असंही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. "कोणाला तरी भेटतात आणि पक्षात येण्याची स्वप्नं बघत असतील तर दरवाजावर मी उभा आहे. यांच्या कुंडल्या माझ्याकडं आहेत, हे लक्षात ठेवा," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच इथले कार्यकर्ते सक्षम होण्यासाठी मी सौदव तुमच्या पाठीशी असल्याचा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा :