मुंबई - 'रयतेचे राजा' छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र आजवर अनेक साहित्यकृती आणि कलाकृतींमधून सामोरं आलं. चित्रपटांपुरतंच बोलायचं झालं तर 'चित्रतपस्वी' भालजी पेंढारकर यांनी आपल्या ऐतिहासिक चित्रपटांमधून पार चाळीसच्या दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज मराठीजनांपर्यंत पोहोचवले. भालजी पेंढारकरांनी बनवलेल्या अनेक ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम स्वरुपी कोरली गेली आहे. १९४३ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बहिर्जी नाईक' या चित्रपटात सुर्यकांत मांढरे यांनी तरुण शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर अनेक ऐतिहासिक चित्रपटातून सुर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत मांढरे दोघंही छत्रपती शिवाजी महाराज अक्षरशः जगले. ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘पावनखिंड’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ अशा कितीतरी चित्रपटांची यादी देता येईल. त्यानंतर आतापर्यंत मराठी सिनेमा आणि मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन अनेकदा झालंय. यापूर्वी रवींद्र महाजनी, श्रीराम गोजमगुंडे, महेश मांजरेकर यासारख्या अभिनेत्यांनीही या भूमिकेला मोठ्या पडद्यावर न्याय देण्याचा प्रयत्न केला. अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर, शंतनू मोघे यांनीही छोट्या तसंच मोठ्या पडद्यावर शिवरायांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटात शरद केळकरनं शिवाजी महाराज निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 'कंतारा' या कन्नड चित्रपटाचा लोकप्रिय अभिनेता ऋषभ शेट्टीही 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटामार्फत महाराजांची महाशौर्यगाथा 'पॅन इंडिया' प्रेक्षकांपर्यत नेण्याचा पण केला आहे. महेश मांजरेकरने 'वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर 'राजा शिवाजी' या चित्रपटासाठी रितेश देशमुख महाराजांची व्यक्तिरेखा जगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटांची घोषणा झाली. पण त्यापुढे काय झालं? हा सर्वसामान्य चित्रपटप्रेमींना पडलेला प्रश्न आहे.
रितेश-अजय अतुल-नागराज मंजुळेंच्या शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचं काय झालं? :
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं पर्व रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी रितेश देशमुख, अजय-अतुल आणि नागराज मंजुळे ही मराठी चित्रपटसृष्टील महान त्रयी एकत्र आली आणि त्यांनी 2020 मध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांची 'महागाथा' निर्माण करण्याचा संकल्प केला. रितेश देशमुख यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमात पोस्ट करून आपल्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या व्हिडिओमध्ये एक वही पहिल्यांदा दिसते. त्यावर - रितेश देशमुख, अजय-अतुल आणि नागराज मंजुळे अभिमानाने सादर करीत आहेत..शिवाजी...राजा शिवाजी...छत्रपती शिवाजी ...महागाथा ही अक्षरं उमटतात.
एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
— Nagraj Popatrao Manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeE
छत्रपती शिवाजी महाराजांवरील या चित्रपटाचे तीन भाग या महागाथेतून सादर करण्याचा प्रस्ताव होता. याध्ये पहिला भाग - शिवाजी, दुसरा भाग - राजा शिवाजी, आणि तिसरा भाग - छत्रपती शिवाजी अशी शीर्षकं ठरवण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या या महागाथेचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची अपेक्षाही उंचावल्या होत्या. स्वतः नागराजनंही सोशल मीडियावर या गोष्टीला दुजोरा दिला होता. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा होती. मात्र 2025 उजाडूनही हा चित्रपटाचं पुढे काय झालं, याबाबत कुठेही वाच्यता होत नाहीय.
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी'चं पुढं काय झालं? : दरम्यान, 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं रितेश देशमुखनं नवीन प्रोजेक्टची घोषणा केली होती, हे खरं आहे. या चित्रपटाचं शीर्षक 'राजा शिवाजी' असं ठरवण्यात आलं. रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी स्वीकारली होती.
AKSHAY KUMAR AS CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ: FILMING BEGINS TODAY… Director #MaheshManjrekar’s #VedatMaratheVeerDaudleSaat - starring #AkshayKumar as #ChhatrapatiShivajiMaharaj - commences shoot today… Produced by #VaseemQureshi. pic.twitter.com/qCcK73swfD
— taran adarsh (@taran_adarsh) December 6, 2022
गेल्या वर्षी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर रितेश देशमुखनं एक व्हिडिओ शेअर केला होता. चित्रपटाची घोषणा करताना रितेशनं म्हटलं होतं की, "छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर एक भावना आहे. त्यांच्या जयंतीच्या शुभ प्रसंगी, मी तुमच्याबरोबर या भूमीच्या या महान सुपुत्राला आदरांजली वाहतो. त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला प्रेरणा देत राहील. आमचा नवीन प्रवास सुरू करताना आम्ही तुमचे आशीर्वाद मागतो. शिवरायांचा जयजयकार!!"
रितेशनं केलेल्या या घोषणेमुळं त्याच्या चाहत्यांना, शिवप्रेमींना मोठा आनंद झाला. परंतु गेल्या वर्षात या चित्रपटाचं पुढं काय अपडेट आहे यावर रितेश देशमुखनं कोणतंही भाष्य केलेलं नाही. सध्या हा प्रोजेक्ट ऑन आहे किंवा नाही याची कोणतीच माहिती त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेली नाही.
अभिमानाने सादर करत आहोत...
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2020
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या....
जय शिवराय !!@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/WIwnZHk3K0
महेश मांजरेकरांच्या 'वीर दौडले सात'चं पुढं काय झालं? : प्रतिभावान दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2022 मध्ये 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार करणार हे जाहीर झाल्यानंतर याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे एकमेव ध्येय असलेल्या सात शूर योद्ध्यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट औत्सुक्याचं विषय ठरला. या चित्रपटाची पहिली झलक वादग्रस्त ठरली. सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज उतरुन चालत पुढं येतात असं हे दृष्य होतं. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अक्षय कुमार प्रेक्षकांना फारसा रुचला नाही. या व्हिडिओत स्टुडिओमधील इलेक्ट्रीक बल्ब दिसल्यानंही मांजरेकरांच्या दिग्दर्शनावर टीका झाली होती. आज या चित्रपटाची घोषणा होऊन तीन वर्षे झाली असतानाही याबद्दल काहीच अपडेट निर्माता वसीम कुरेशी अथवा दिग्दर्शक मांजरेकर किंवा अक्षय कुमारकडून मिळालेलं नाही.
Chhatrapati Shivaji Maharaj is not just a name but an emotion. On the auspicious occasion of his birth anniversary, I join you in paying homage to the great son of the soil. May his legacy continue to inspire us for generations to come.
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2024
We seek your blessings as we begin our new… pic.twitter.com/HPAQXhaygN
'खिलाडी'कुमार प्रोजेक्टमध्ये आहे की नाही? :अनेकदा एखादी व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेबरहुकुम पेहेराव, वागण्याबोलण्याची ढब आत्मसात करण्याचा प्रयत्न कलाकार करतात. 'छावा' च्या प्रदर्शनापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या विकी कौशलचा वावर चित्रपटरसिकांना आठवत असेलच. शिवाय ऐतिहासिक व्यक्तिरेखेला न्याय देताना कलाकार मंडळी आपल्या इमेजची अतिरिक्त काळजी घेतात. मात्र अक्षय कुमार अगदी आपल्या नेहमीच्या अंदाजात विविध कार्यक्रमांमध्ये दिसतो. 'वेडात मराठे वीर दौडले सात' च्या घोषणेनंतर अक्षयची प्रमुख भूमिका असलेले काही चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र या चित्रपटाबद्दल स्वतः अक्षय कुमारही चर्चा करत नाही.
सध्याच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट कमी आले तरी चालतील, मात्र येतील ते परिपूर्णच असावेत, याबाबत कुणाचं दुमत होणार नाही. त्यामुळे वर उल्लेखलेल्या सर्व दिग्गजांनी परिपूर्णतेच्या आग्रहाखातर आपापल्या प्रोजेक्टबद्दल तोंडावर बोट ठेवण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्या निर्णयाचंही स्वागत व्हायला हवं. शेवटी विषय स्वराज्याच्या 'छत्रपतीं'चा आहे.