नवी दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी ( Sonia Gandhi in hospital) यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षांची प्रकृती ठीक आहे. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असे सूत्रानं सांगितलं.
७७ वर्षीय सोनिया गांधींना गुरुवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. रिपोर्टनुसार सोनिया गांधी या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली आहेत. सर गंगा राम रुग्णालयाचे डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले, पोटाशी संबंधित समस्यांमुळे सोनिया गांधींना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, काळजी करण्यासारखे काही नाही. शुक्रवारी सकाळपर्यंत सोनिया गांधींना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार सोनिया गांधींना पोटाच्या आजारामुळे गुरुवारी सकाळी ८.३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचे रुटिन चेकअप करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.
- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी गेल्या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सहभाग घेतला होता. केंद्र सरकारनं जनगणनेच काम लवकरात लवकर पूर्ण करावं, अशी सोनिया गांधी यांनी १० फेब्रुवारीला मागणी केली. देशातील सुमारे १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत, असा त्यांनी दावा केला होता.
- वाढत्या वयोमानामुळे सोनिया गांधी यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या आहेत. त्यांच्या जागी राहुल गांधी हे रायबरेली संसदीय मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. सोनिया गांधींनी दीर्घकाळ काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले.
- सोनिया गांधी यांना २०२३ मध्ये किमान तीनवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जानेवारी २०२३ मध्ये सोनिया गांधी यांना व्हायरल श्वसन संक्रमणाच्या उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
हेही वाचा-