गुरुग्राम : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं 4.97 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या आरोपाखाली दिल्लीतील एका खाजगी बँकेच्या कर्मचाऱ्यासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. इंडसइंड बँकेच्या आरोपी कर्मचाऱ्यानं सायबर गुन्हेगारांना बँक खात्याबाबत माहिती दिली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
4.87 कोटी रुपयांची फसवणूक
पोलिसांनी सांगितलं की, 30 नोव्हेंबर 2024 रोजी अंदाजे 4.87 कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार प्राप्त झाली होती. संबंधित कलमांखाली सायबर क्राइम पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकणात तपासादरम्यान पोलीस पथकानं गुरुवारी दिल्लीहून अविनाश शर्मा आणि आदित्य चतुर्वेदी यांना अटक केलीय.
फसवणुकीसाठी बॅंक खात्याचा वापर
चतुर्वेदी गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील गुजरानवाला टाउन-2 शाखेतील इंडसइंड बँकेत व्यवसाय विकास व्यवस्थापक म्हणून काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, शर्मा यांचं बँक खातं फसवणुकीसाठी वापरण्यात आलं. चतुर्वेदीनं त्यांना 25,000 रुपयांसाठी त्यांच्या खात्याची माहिती दिली होती, असं चौकशीत उघड झालंय.
एका पत्त्यावर उघडी अनेक खाती
बँकेत काम करत असताना, चतुर्वेदी यांना दुसऱ्या एका व्यक्तीनं संपर्क साधला आणि त्यांना बचत बँक खात्यासाठी 10,000 रुपये आणि चालू खात्यासाठी 50,000 रुपये देऊ केले. त्यानंतर आरोपीनं शर्मा यांच्या दुकानाच्या पत्त्याचा वापर करून अनेक खाती उघडण्यास मदत केली, असं पोलिसांनी सांगितलं.
किमान 12 तक्रारी दाखल
सहाय्यक पोलिस आयुक्त (सायबर) प्रियांशू दिवाण म्हणाले की, शर्मा यांच्या एकाच बँक खात्याविरुद्ध जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, महाराष्ट्र आणि कर्नाटकात किमान 12 तक्रारी दाखल झाल्या आहेत. आरोपींकडून पुढील चौकशी सुरू आहे, असे दिवाण म्हणाले.