कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं टीका केली. मात्र, आता या नेत्यांच्या वादात नवा ट्विस्ट आलाय. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची रुग्णालयात भेट घेतल्यानं वेगवेगळे तर्क-वितर्क काढले जात आहेत. तसंच या मुद्द्यावरुन आता विरोधकांनी सुरेश धस यांना धारेवर धरलंय. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी देखील आता या मुद्द्यावर संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
नेमकं काय म्हणाले सतेज पाटील? : यासंदर्भात कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सतेज पाटील म्हणाले की, "संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस ज्या द्वेषानं लढत होते, तो लढा संपलाय. हे जवळजवळ सिद्ध झालंय. जर ही भेट खासगी होती, तर प्रदेशाध्यक्षांनी ते जाहीर का केलं? आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना यासंदर्भातील माहिती दिली होती का?,"असा सवाल सतेज पाटील उपस्थित केला. तसंच सुरेश धस यांनी घेतलेली भेट ही मराठा समाजाची आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोल्हापुरात खंडणीचं वातावरण हे दुर्दैव : सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा प्रमुखानं परप्रांतीय व्यापाऱ्याकडं खंडणी मागितल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या संदर्भात विचारण्यात आलं असता सतेज पाटील म्हणाले, "सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, याचं हे उदाहरण आहे. जिल्हा पोलिसांनी तथाकथित खंडणी बहाद्दरावर कारवाई करावी. कोल्हापुरात खंडणीचं वातावरण तयार होतंय हे दुर्दैव आहे."
हेही वाचा -