कोल्हापूर : "आज शिवाजी महाराजांची 395 वी जयंती, पाच वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 400 वर्षे पूर्ण होतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य निश्चितच देशातील सर्वांना मार्गदर्शक ठरलं आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गानं आपण पुढे जाऊ यातून देश पुढं जाईल आग्र्यामध्ये शिवजयंती साजरा होत आहे याचा आनंद आहे. आग्रामधून छत्रपती शिवाजी महाराज निसटले. महाराजांच्या गनिमी काव्याचं हे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून परत कसे आले? हे कोणालाच माहीत नाही. या संदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. मध्यंतरी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी चुकीचं वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून निसटले हे निश्चित आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या माणसांना पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची आहे." असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, सरकारची कारवाई योग्य : "विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही. विकिपीडियामध्ये ज्याला जे वाटते ते तो टाकतो. पण, ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्यांचा निषेध केला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर असलेला मजकूर बदनामीकारक असल्याने तो काढून टाकायला हवा. महाराष्ट्र सरकारनं त्यासंदर्भात केलेली कारवाई योग्य आहे." असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
पुतळ्यांची दखल घेतली पाहिजे : मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा फेरउभारणीचं काम राज्य सरकारनं आजपासून सुरू केलं आहे, याबाबत विचारलं असता खासदार शाहू महाराज छत्रपती महाराज म्हणाले, "राज्य सरकारनं सर्वच पुतळ्यांची दखल घेतली पाहिजे. नवीन पुतळे बांधत असताना परवानगीप्रमाणं पुतळे बांधत आहेत का? हे तपासलं पाहिजे. त्यामध्ये कोणते धातू वापरत आहेत. सिमेंट स्टीलचा दर्जा काय आहे? याचा रिपोर्ट तपासायला हवा."
शिवाजी चौकात 51 बाल मावळ्यांची शिववंदना : कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ इथल्या शिवाय ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी चौकात 51 बाल मावळ्यांनी शिववंदना सादर केली. यावेळी खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी, किशोर घाटगे उपस्थित होते.
हेही वाचा :