जयपूर - बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सध्या राजस्थानमध्ये त्याच्या आगामी 'भूत बांगला' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. यावळी त्यानं सह-कलाकार परेश रावलबरोबर पतंग उडवतानाचा आनंद लुटला. याचा एक व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"माझा प्रिय मित्र परेश रावल बरोबर भूत बंगलाच्या सेटवर मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहे! हास्य, चांगलं वातावरण आणि पतंगांसारखीच उंच भरारी! आनंदी पोंगल, उत्तरायण आणि बिहूसाठी माझ्या शुभेच्छा पाठवत आहे," असं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणं ही भारताच्या विविध प्रांतातली अगदी जुनी परंपरा आहे. हा उत्सव दरवर्षी १४ जानेवारी रोजी देशभरात साजरी केला जातो. असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणं संपूर्ण हिवाळ्यात विश्रांती घेतलेल्या देवांसाठी जागृतीचा इशारा देतं.
अक्षयच्या 'भूत बांगला' चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. तब्बू देखील या हॉरर-कॉमेडीचा एक भाग आहे. अलीकडेच, तिनं या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील होण्याबद्दल तिचा उत्साह व्यक्त केला. तब्बूनं चित्रपटाचे शीर्षक असलेल्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला होता.
भूत बांगला या चित्रपटासाठी १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एकत्र आले आहेत. या जोडीनं यापूर्वी हेरा फेरी, गरम मसाला, भागम भाग आणि भूल भुलैया सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी शैलीतील आहे. अंधाधुन आणि हैदर सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या बहुमुखी प्रतिभेसाठी प्रसिद्ध असलेली तब्बू या चित्रपटात एक अनोखी भूमिका साकारेल अशी अपेक्षा आहे.
'भूत बांगला' चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्स आणि अक्षय कुमार यांच्या प्रोडक्शन हाऊस, केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.