कोल्हापूर : "शहरात मागील काही वर्षापासून वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि कमी पडत असलेला रस्ता अशा अनेक समस्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल मार्गावर उड्डाणपूल व्हावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूरकर करत होते. आता याला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे." अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
नितीन गडकरी यांनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी (दि.17) खासगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नवीन राजवाडा इथं खासदार शाहू छत्रपती महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेस आमदार सतेज पाटील, भाजपा आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. "20 मिनिटे झालेल्या भेटीत कोल्हापूरच्या विकासा संदर्भात चर्चा झाली. कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळं नागरिकांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी कोल्हापुरातील मार्केट यार्ड ते सीपीआर हॉस्पिटल ते शिवाजी पूल दरम्यान उड्डाणपूल करण्यात यावा. तसंच कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील केर्ली इथं होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून केर्ली ते शिवाजी पूल रस्त्याचं चौपदरीकरण करण्यात यावं अशा मागण्या खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी नितीन गडकरी यांच्याकडं केली" अशी माहिती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूलाला मान्यता : कोल्हापूर विमानतळ इथं नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त मंजुलक्ष्मी, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग संदर्भातील अनेक अडचणी आणि प्रश्न मांडण्यात आले. "कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाणपूल करण्यासाठी नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना लवकरात लवकर डिझाईन करून देण्याचे आदेश दिले. तसंच कोल्हापुरात महापूर आला की, पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद होतो. याला पर्याय म्हणून खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिज संकल्पना मांडली होती. शिरोली ते तावडे हॉटेल मार्गावर सव्वाचार किलोमीटरचा एलिव्हेटेड ब्रिज तयार करून त्याला बास्केट ब्रिज जोडण्यासाठी तसंच कागल इथल्या पुलासाठी असे एकूण 624 कोटींच्या बजेटला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून, लवकरच याचं टेंडर निघून कामाला सुरुवात होईल." अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
हेही वाचा :