पानिपत : "मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या (Panipat) युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल," अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असंही त्यांनी सांगितलं. पानिपत युध्दाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील काला आम परिसरात मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी फडणवीस बोलत होते. १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते.
महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार : फडणवीस यांनी सांगितलं की, "पानिपतच्या युध्द मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले. त्यानंतर झालेल्या अनेक मोहिमा मराठयांनी केवळ जिकंल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडं देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळयांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठयांनी एका काळी राखले. म्हणूनच या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पानिपत शौर्य स्मारकासाठी आणखी जमीन आवश्यक असून त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल", असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
हिंदवी स्वराज्याची केली स्थापना : यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला नाही. त्यावेळी जे मराठा लढले, ते पुन्हा उभे राहिले आणि दहा वर्षात दिल्लीचे तख्त काबीज केले. छोट्या छोट्या लढायांमधील हार म्हणजे युद्धातील पराभव नाही. पानिपतची ही भूमी मराठ्यांच्या रक्ताने लाल झाली. मराठ्यांनी केवळ मुघलांचा पराभव केला नाही, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना देखील केली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक मात्र असे नायक आहेत, ज्यांनी देशाचा इतिहास बदलला. महाराजांनी जातीच्या पलीकडं जाऊन मावळ्यांचं सैन्य उभारलं. ते मुघलांशी लढले, मुघलांचा पराभव करत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली".
यांची होती उपस्थिती : कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच खासदार राजाभाऊ वाझे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा -