शिर्डी : भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडलं. या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं तर विरोधकांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा मोठा कार्यक्रम असल्यानं राज्यभरातील भाजपाचे बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. दरम्यान, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
दगाफटक्याच्या राजकारणाला गाडलं : "विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. या यशात खऱ्या शिवसेनेचा आणि खऱ्या राष्ट्रवादीचा विजय झाला. महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या विजयामागं अनेक कारणं आहेत. शरद पवारांनी 1978 पासून दगफटाक्याच्या राजकरणाला सुरुवात केली. त्यांच्या या दगाफटाक्याच्या राजकारणाला 20 फूट मातीत घालण्याचं काम महाराष्ट्रानं केलं", अशी जोरदार टीका अमित शाह यांनी शरद पवारांवर केलीय.
"उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत 2019 ला गद्दारी केली. हिंदुत्वाची विचारधारा आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केला. आमच्यासोबत दगाफटका करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आमच्यासोबत दगाफटका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेनं त्यांची जागा दाखवली. - अमित शाह, केंद्रीय मंत्री
काय म्हणाले अमित शाह? : 1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी केली. त्यांनी त्यावेळी विश्वासघात करण्याचं जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही 2019 मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचं काम तुम्ही केलं. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली. 1978 ते 2024 पर्यंत महाराष्ट्र जेव्हा जेव्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्या, त्या वेळी स्थिर सरकार देण्याचं काम तुम्ही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणास विरोध करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवला. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना खऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विजय केलं, असं केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.
हेही वाचा -