ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात समाविष्ट असलेल्या 33 पोलीस ठाणे असून आता आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस ठाण्यांची आवश्यकता ठाणे पोलिसांना भासू लागली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नव्या पाच पोलीस ठाणे वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडं पाठवला आहे. येणाऱ्या काळात ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांची संख्या 38 होणार आहे. त्या सोबतच वाढ होणाऱ्या पोलीस ठाण्यांना मनुष्यबळाची गरज असून त्याचीही मागणी शासनाकडं प्रस्ताव पाठवून करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत पाच परिमंडळ : ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत पाच परिमंडळ असून या पाच परिमंडळात 33 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. ठाणे पोलिसांच्या नव्या पाच पोलीस ठाण्याच्या मागणीमुळे आता पोलीस ठाण्याची संख्या वाढणार आहे. सदरची पाच प्रस्तावित पोलीस ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील, लोकसंख्या आणि हद्दीचा आढावा घेऊन सुरु करणार आहेत. नव्या पाच पोलीस ठाणे भिवंडी, उल्हसनगर, कल्याण, शीळ-डायघर परिसरात होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत आयुक्तालयाच्या हद्दीत पाच परिमंडळाचे पाच पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक आयुक्त आणि 33 वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत. तर नव्या पाच पोलीस ठाण्यांमुळे एक पोलीस उपायुक्त आणि 2 सहाय्यक पोलीस आयुक्त वाढण्याची अपेक्षा आहे. पाच परिमंडळात एका उपायुक्तांच्या अखत्यारित परिमंडळ- 4 व्यतिरिक्त सर्वच परिमंडळात सहा पोलीस ठाण्याचा समावेश आहे. तर परिमंडळ-4 मध्ये 8 पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
परिमंडळात असलेल्या पोलीस ठाण्यांचा तपशील :
परिमंडळ-1 अंतर्गत - ठाणे नगर, राबोडी, नौपाडा, मुंब्रा, कळवा, शीळ-डायघर
परिमंडळ -2 अंतर्गत -भिवंडी शहर, भोईवाडा, शांती नगर, निजामपुरा, नारपोली, कोनगाव
परिमंडळ-3 अंतर्गत - डोंबवली, मानपाडा, तिलकनगर, विष्णू नगर, बाजारपेठ, महात्मा फुले, कोळशेवाडी
परिमंडळ -4 अंतर्गत- सेंट्रल, उल्हासनगर, हिललाईन, बदलापूर(प), शिवाजीनगर, बदलापूर(पु), अंबरनाथ, विठ्ठलवाडी
परिमंडळ -5 अंतर्गत - वागळे, कापूरबावडी, वर्तकनगर, कोपरी, श्रीनगर, कासारवडवली
दिवा वासीयांची पोलीस ठाण्याची मागणी : दिवसेंदिवस दिव्याची लोकसंख्या वाढली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी दिवा वासीयांनी नव्या पोलीस ठाण्याची मागणी अनेकवर्षांपूर्वी आणि सातत्यानं केली आहे. तेव्हा लोकसंख्येनुसार नव्या पाच पोलीस ठाण्यामध्ये दिव्याच्या पोलीस ठाण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. दिवा वासीयांना साधी तक्रार करण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पोलीस ठाणे लांब असल्यानं बहुतांश नागरिक हे पायपीट करावी, लागते यामुळे तक्रार करण्यास जात नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांचे फावते. दिव्यात लोकसंख्याप्रमाणंच गुन्हेगारी वाढत असल्याचा सूर नागरिकांनी काढला आहे. तर दिवा पोलीस ठाण्याची सातत्यानं मागणी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक शाखेचे देखील होणार विभाजन : "ठाणे शहर वाहतूक शाखेमध्ये होणाऱ्या तक्रारी यासाठी कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर इथून लोकांना यावे लागते. हा वेळ वाचवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी नवीन प्रस्तावित वाहतूक शाखेचं विभाजन करून कल्याण डोंबिवलीसाठी नवीन शाखा तयार करण्याचा प्रस्ताव देखील दिलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला असून यावर लवकरच अंमलबजावणी देखील होणार आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.