मुंबई : राज्यात गोरगरीब रुग्णांना आणि तळागळातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य व्हावं आणि त्यांना उपचार वेळवर मिळावे, या हेतूनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाची स्थापना 2015 साली करण्यात आली. मंत्रालयातील सातव्या मजल्यावर हा कक्ष कार्यरत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून राज्यातील विविध भागातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्यात आलं आहे. दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या कक्षाचा कायापालट आणि मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे. याची कशी असणार प्रक्रिया? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात किती रुग्णांना किती कोटींची मदत करण्यात आली ? आणि एकंदरीत या योजनेचा रुग्णांना कसा फायदा होतोय? अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे? पाहूया याचा विशेष आढावा.
![Chief Minister Health Relief Fund](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2025/mh-mum-7212052-cmhealthrelifefundspecialstory_14022025172309_1402f_1739533989_969.jpg)
रुग्णांच्या नातेवाईकांना आता मुंबईला यायची गरज नाही : रुग्णांच्या नातेवाईकांना आता आर्थिक मदतीसाठी मंत्रालयात येण्याची गरज नाही. तर राज्यातील जिल्हा पातळीवर याचा अर्ज करून तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. फेसलेस आणि पेपरलेस देखील प्रक्रिया असणार आहे. या कक्षातून मदत मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागत असे. परंतु ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ज्यांना माहीत नव्हती, किंवा ज्यांच्याकडं स्मार्ट मोबाइल नव्हता, अशांना प्रत्यक्ष अर्ज घेऊन मंत्रालयात तासनतास रांगेत उभं राहावं लागत असे. यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाही खर्च होत असे. परंतु आता "रुग्णाच्या नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयात येण्याची गरज नाही. तर आम्ही राज्यातील जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे जर कोणी गरजू असेल, तर त्यांनी थेट तिथं जाऊन सर्व कागद पत्रांसोबत अर्ज दाखल करावा. त्यानंतर आमच्या कक्षाचे कर्मचारी, अधिकारी रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून त्यांना मदत मिळवून देतील," अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
टोल फ्री नंबर काय आहे? : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मागील दोन-अडीच महिन्यात अनेक रुग्णांना करोडो रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना दिली आहे. तर दुसरीकडं "जर गोरगरीब, गरजू आणि नातेवाईकांना दाखल केलेल्या अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी, त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी, किंवा आर्थिक मदतीसाठी ‘18001232211’ या टोल फ्री नंबरवरती आमच्याशी संपर्क साधावा," असं आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे.
मदतीची मर्यादा किती? : "मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना महागड्या उपचारासाठी आर्थिक साह्य व्हावं, यासाठी या कक्षातून मदत दिली जाते. जास्तीत जास्त एक लाख रुपयांची मदत रुग्णांना दिली जाते. पण जर विशेष प्रकरण असेल, मुख्यमंत्र्यांची शिफारस असेल आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असेल, त्या प्रकरणात कितीही मदत दिली जावू शकते," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अर्ज कसा भरायचा? : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये जर एखाद्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना अर्ज दाखल करायचा असेल, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज दाखल करता येऊ शकतो. रुग्ण व्यक्तीची सर्व आवश्यक कागदपत्रे, रुग्णालयाची कागदपत्रं आणि बँकेचा तपशील आदी माहिती अर्जासोबत जोडावी लागणार आहे.
जिल्हा पातळीवर काम कसं राहणार? : "मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या मार्फत आगामी काळात ग्रामीण भागातून लोकांना मुंबईत यावं लागणार नाही. प्रत्येक जिल्ह्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. जिल्हा पातळीवर एक समिती असणार आहे. जिल्हा पातळीवरील कक्ष जो रुग्ण एखाद्या रुग्णालयात दाखल आहे, त्या रुग्णालयाला पोर्टलच्या माध्यमातून ट्रॅक करणार आहे. त्यामुळं रुग्णांना खेटे मारावे लागणार नाहीत. परिणामी रुग्णांना मदत मिळण्यास अधिक पारदर्शकता येईल," असं कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं.
हेही वाचा :