अमृतसर- अमेरिकेत बेकायदेशीरपणे गेलेल्या भारतीयांना घेऊन येणारे आणखी दुसरे विमान अमृतसर विमानतळावर पोहोचले आहे. या विमानात ११९ भारतीय आहेत यापैकी ६७ जण पंजाबचे आहेत. तर इतर उर्वरित इतर राज्यांचे होते. दुसऱ्यांदा विमान अमृतसरमध्ये उतरल्यानं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि केंद्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे.
शनिवारी हद्दपार करण्यात आलेल्या लोकांमध्ये पंजाबचे ६७, हरियाणाचे ३३, गुजरातचे ८, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी २ आहेत. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रत्येकी १ जण आहेत.
पोलिसांच्या वाहनांद्वारे नागरिकांना पाठवले घरी- महिला आणि मुले वगळता सर्व पुरुषांना हातकड्या घालून शनिवारी रात्री ११.३० वाजता अमेरिकन एअर फोर्स ग्लोबमास्टर विमानानं अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानतळावर काही स्थलांतरितांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंब आले होते. सुमारे ५ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांच्या वाहनांमध्ये पंजाबमधील स्थलांतरितांना घरी पाठवण्यात आलं. या काळात कोणत्याही नागरिकाला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नव्हती.
भगवंत मान यांची केंद्र सरकारवर टीका- अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांचे दुसऱ्यांदा विमान अमृतसरमध्ये उतरणार असल्यानं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान शनिवारी संतापले. केंद्रातील भाजप सरकारला पंजाबी लोक अजिबात आवडत नाहीत. त्यामुळेच पवित्र शहर अमृतसरला निर्वासितांचे केंद्र बनवले जात असल्याचा त्यांनी आरोप केला. इतर देशांप्रमाणे भारतानंदेखील नागरिकांना सन्मानानं आणण्यासाठी विमान पाठवावं, अशी त्यांनी मागणी केली. पंजाबींना बदनाम करण्याचा केंद्र सरकारनं कट रचल्याचा मुख्यमंत्री मान यांनी आरोप केला. परराष्ट्र मंत्रालयानं कोणत्या निकषांवर अमेरिकेतील विमान उतरवण्यासाठी अमृतसरची निवड केली, हे जाहीर करावं, असं त्यांनी आवाहन केलं.
भगवंत मान यांच्या टीकेला प्रत्युत्तर -पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेतून अजून आणखी विमाने येणार आहेत. ही विमाने अहमदाबाद, दिल्लीसह देशाच्या वेगवेगळ्या भागात उतरणार आहेत. अमेरिकेत डिटेंशन सेंटरमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या खूप जास्त आहे. लवकरच त्यांना भारतात आणले जाईल. पंजाब सरकारनं फसणूक करणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सवर कारवाई करावी. जर त्यांनी तशी कारवाई केली नाही तर केंद्र सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करेल, असा त्यांनी इशारा दिला.
अमानुष वागणुकीमुळे देशात तापलं होतं राजकीय वातावरण- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमृतसर विमानतळावर स्थलांतरितांचे दुसरे विमान उतरलं आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या १०० हून अधिक भारतीयांना घेऊन अमेरिकन हवाई दलाचे विमान पंजाबच्या अमृतसरमध्ये उतरले होते. अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांना मिळालेल्या अमानुष वागणुकीमुळे देशात राजकारण तापलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात भारतीयांना परत घेतले जाईल, असे जाहीर केले. मात्र, मानवी तस्करी व्यवस्थेला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारनं प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
राज्यात नागरिकांना नेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून विमाने बुक- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अमेरिकेतून येणाऱ्या स्थलांतरितांना योग्य वागणूक दिली जाईल, असे आश्वासन दिलं. तसेच सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. स्थलांतरितांना त्यांच्या संबंधित राज्यात जाण्यापूर्वी काही तास अमृतसरमध्ये राहावे लागणार आहे. त्यांच्यासाठी जेवणासह राहण्यासह व्यवस्था पंजाब सरकारनं केली आहे. संबंधित राज्यात नेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं आधीच विमाने बुक केली आहेत.
- प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ७,२५,००० बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात. मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर अनधिकृत स्थलांतरितांच्या संख्येत भारतीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत.