यवतमाळ : झारखंड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलय. दिलीप उर्फ तुलसी मेहतो असं या नक्षलवाद्याचं नाव आहे. तुलसी हा 1993 मध्ये झारखंडमधील नक्षली गटात भरती झाला होता. 1997 मध्ये ‘भितीया दलम’ चा विभागीय कमांडर म्हणून नियुक्ती मिळाली. त्यानं बारा सशस्त्र नक्षलवाद्यांचं नेतृत्व केलय. सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड अशा अनेक हिंसक कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. झारखंड पोलिसांच्या नोंदीनुसार त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. गेल्या तेरा वर्षापासून नाव बदलून तो यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास होता अशी माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली.
नक्षल्यांचे 'रेस्ट झोन' आहे का? : झारखंड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकानं तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात केली. या कारवाईनं पुन्हा एकदा वणी तालुकाच नव्हे तर जिल्ह्याचे केंद्र असलेल्या यवतमाळ मुख्यालय नक्षल्यांचे 'रेस्ट झोन' आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे.
यवतमाळ पोलिसांनी घेतलं ताब्यात : दिलीप या नक्षल दलम कमांडरने सहकाऱ्यांचा विश्वासघात करत नक्षल चळवळीच्या तिजोरीवरच आर्थिक डल्ला मारला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस होताच, सहकारी त्याचा 'गेम' करण्याच्या तयारीत होते. 'गेम' होणार याची पूर्वकल्पना असल्याने तो तिथून पसार झाला आणि तो यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी येऊन राहिला. त्यानंतर त्यानं आपला मुक्काम पारवा आणि नंतर यवतमाळ शहरात तलाव फैल भागात केला होता. 13 वर्ष त्यानं यवतमाळ शहरात मुक्काम केला. या नक्षलीची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवून त्याला यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली.
हेही वाचा -
- How Naxal Problem Be Solved : नक्षलवादापासून कशी मिळू शकते सुटका; नक्षल तज्ज्ञांनी सांगितला हा मार्ग
- Dantewada Naxalite Attack : नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू करावी, देशभरातून नक्षल हल्ल्याविरोधात संताप
- Naxal Police Encounter in Gadchiroli: गडचिरोलीच्या जंगलात नक्षल-पोलीस चकमक; इनामी नक्षलवादी ठार