पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) च्या परीक्षेला आजपासून सुरुवात झालीय. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले आणि 7,47,471 मुली आहेत आणि 19 तृतीयपंथी आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना ताणतणाव येऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पुण्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलंय.
परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना : आज 23492 माध्यमिक शाळांमध्ये या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5130 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलीय. आज मराठीचा पहिला पेपर असून, विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कुठलाही ताणतणाव येऊ नये, यासाठी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं औक्षण करत गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आलंय. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, आज आमचा पहिला पेपर असून, अभ्यास पूर्ण झालाय. पण पहिला पेपर आहे म्हणून तणाव आहे. आज औक्षण तसेच स्वागत केल्यानंतर हा तणाव कमी झालेला आहे आणि अतिशय चांगला पेपर जाईल, अशी अपेक्षा यावेळी यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय. यावेळी नू.म.वी. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे म्हणाले की, दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्यात. त्या अनुषंगाने परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी केली जातेय. तसेच आमच्या केंद्रावर कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार होणार नाहीत, याचीदेखील काळजी घेण्यात येतेय. तसेच पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवं म्हणून आज विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलंय.
परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड : फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यात आलेली असून, सरल डेटावरून माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाइन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आलाय. मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असंही सांगितलं जातंय.
विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली : परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहणार : परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परीरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परीरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत आणि वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्यात. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता आणि उत्तरपत्रिका आणण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवली : सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता आणि दुपार सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात सकाळी 11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत. कोरोना काळातील वर्ष 2021 व वर्ष 2022 या दोन परीक्षा वगळून मागील 5 वर्षांच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2018, 2019, 2020, 2023 व 2024 या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.
परीक्षा पारदर्शक होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन : फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात 10 वी आणि 12 वीची परीक्षा पारदर्शक होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सार्वजनिक परीक्षा निकोप वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळामार्फत राज्यातील मा. जिल्हाधिकारी (सर्व), मा. विभागीय आयुक्त (सर्व) यांना अर्धशासकीय पत्राद्वारे आवाहन करण्यात आलेले आहे.
विशेष भरारी पथके स्थापन : परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल.
सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र मिळणार : परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके आणि बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित घटकांची Facial Recognition System द्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention Of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 163 कलम लागू करण्यात येईल.
हेही वाचा :