मुंबई - मधुर प्रेमगीतं, हृदयस्पर्शी कविता, मनाला भावणारं सर्व कलांचं सादरीकरण यासह सर्व स्वरुपांच्या प्रेमाचा उत्सव असलेला प्रेमिडोस्कोप हा आगळा वेगळा शो स्व निर्मिती या यूट्यूब चॅनेलवर आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं सुरू झाला आहे. अभिनेत्री करिश्मा आणि गंधर्व गुळवेकर यांची सुंदर प्रहसनं यांच्या बरोबर गायक पद्मनाभ गायकवाड आणि गायिका स्नेहा हेगडे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाचा आणि संगीतांचा आस्वाद या कार्यक्रमातून घेता येणार आहे.
या शोची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन वैभव कुलकर्णी यांचं आहे. स्मिता सुर्यवंशी, बाजीराव सुर्यवंशी आणि वैभव कुलकर्णी यांनी याची निर्मिती केली आहे. संगीत संयोजन अर्थात पद्मनाभ गायकवाड याचे आहे. करिष्मा पठारे, विष्णू घोलमे, ओंकार लोळगे, स्नेहा हेगडे, ओंकार इंगवले, ओंकार उजगरे, रविंद्र साप्ते, गंधर्व गुळवेकर, शुभम कुलकर्णी आणि इतर कलाकारांनी यात आपल्या अनोख्या कलेचे प्रदर्शन केलंय.
मराठी अभिरुची जणारा हा सांगितिक कार्यक्रम तरुणाईसाठी वेगळं आकर्षण ठरु शकतो, असा विश्वास यानिमित्तानं बाळगण्यास हरकत नाही. याविषयी बोलताना वैभव कुलकर्णी यांनी सांगितलं की, "पाच वर्षापूर्वी 2029 मध्ये आम्ही प्रेमिडोस्कोप नावानं एक साहित्य आणि संगीतांचा मिलाफ असलेला कार्यक्रम वेगवेगळ्या शहरात करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठीची सर्व तयारी आम्ही केली. पद्मनाभ गायकवाडची संगीत साथ मिळाल्यानं एक बहारदार कार्यक्रमाचं आरेखन तयार झालं, शोची सुरुवातही झाली."
प्रेमिडोस्कोप हा शो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात सादर करण्याचा कलाकारांचा विचार होता. त्यासाठीची संपूर्ण तयारीही टीमनं केली होती, याविषयी बोलताना वैभव कुलकर्णी म्हणाले, "नव्या पिढीचा विचार करुन त्यांना कोणती गाणी आवडू शकतात याचा विचार करुन गाण्यांची निवड आम्ही केली, त्याच्या रिहर्सल झाल्या आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी आम्ही सज्ज झालो. यासाठी आम्ही मोठा तामजाम तयार केला होता. गायक, गायिका, प्रहसनाचे कलाकार, नृत्यं, वाद्यवृंद, नेपथ्य, म्यूझिकल आणि शोसाठीची इतर इक्विपमेंट्स, वाहनं असा सारा लवाजमा घेऊन बाहेर पडण्यापूर्वीच कोरोनामुळं सगळं थांबवावं लागलं. त्याकाळात सर्वप्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी आल्यानं बराच काळ थिएटर्सही बंद राहिली. याकाळात कलाविश्वाला मोठा फटका बसला त्याची झळ आमच्या कार्यक्रमालाही बसली. यात प्रेमिडोस्कोपचा गुलाब कोमेजला. आता हाच प्रेमिडोस्कोप प्रेक्षकांना ताजेतवाना करु शकतो असा विश्वास वाटल्यानं आम्ही याचे भाग रिलीज करत आहोत," असं कुलकर्णी म्हणाले.
संगीतातून बाहरणारा प्रेमाचा कॅलिडोस्कोप अशीच याची मांडणी आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक त्याच्या आणि तिच्या प्रेमाची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. प्रेमातले सगळे रंग आणि भाव तरळपणे मांडणारा सांगीतिक अनुभव देणारा हा शो आजपासून 'स्व निर्मिती' या यूट्यूब चॅनेलवर प्रवाहित झाला आहे.
हेही वाचा -
- हर्षवर्धन राणेनं 'सनम तेरी कसम'च्या यशानंतर आगामी चित्रपटाची केली घोषणा...
- व्हॅलेंटाईन डे 2025 : 'हे' सेलिब्रिटी जोडपे रील कपल्समधून रिअल लाईफमध्ये बनले पार्टनर, जाणून घ्या प्रेमकहाणी...
- विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स, 'छावा'चं प्रेक्षकांसह समीक्षकांकडून जोरदार स्वागत