बुलढाणा : "जिल्ह्यातील केस गळती हा आजार कशामुळं झालाय हे शोधण्यासाठी सोमवारी दिल्ली, चेन्नई येथून विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची टिम बोलवण्यात आली आहे. आयुर्वेद यूनानी, होमिओपॅथी, अॅलोपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या केस गळती आजारावरचं संशोधन करत आहेत. नागरिकांनी घाबरू नये," असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं.
आजाराच्या मुळाशी जाऊन संशोधन करणार : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अकरा गावामध्ये नागरिकांचे केस गळती होऊन टक्कल पडत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. आज (11 जानेवारी) प्रतापराव जाधव यांनी केस गळती बाधित गावांना भेटी दिल्या. रुग्णांसोबत संवाद साधला आणि आजाराविषयी जाणून घेतलं. हा आजार पहिल्यांदाच उद्भवला असल्यानं आजाराच्या मुळाशी जाऊन संशोधन करणं गरजं आहे. या दृष्टिकोनातून सरकारच्या आरोग्य विभागातर्फे उपाय योजना सुरु आहेत. घरगुती वापरातील तेल, साबण, शाम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. नागरिकांनीही या उत्पादनांची मुदतबाह्य झाली आहे का? याचीही तपासणी करुन ते वापरण्याचं आवाहन प्रतापराव जाधव यांनी केलं.
आरोग्य विभाग तुमच्या सेवेत राहणार : "केस गळती होत असलेल्याच्या घटनांची वेळीच दखल घेऊन मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि धीर देण्यासाठी आलो आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे आरोग्य विभाग 24 तास तुमच्या सेवेत राहणार आहे," असं मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते.
गावांचे नाव, केस गळती झालेल्या ग्रामस्थांची संख्या -
1) बोडगांव -20
2) कालवड -22
3) कटोरा- 13
4) भोनगाव - 7
5) मच्छिंद्र खेड -5
6) हिंगणा वैज - 5
7) घुई - 8
8) तरोडा कसबा - 10
9) पहुरजिरा- 23
10) माटरगाव बु - 19
11) निंबी- 5
तपासणीसाठी पाणी पाठवले : एकूण बाधितांची संख्या 137 वर पोहोचली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ दखल घेण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे. सर्व बाधित गावांतील बोअरवेल, विहीर आणि नदी, तलावाचे पाणी तपासणी करीता GSDA बुलढाणा पाण्याचे स्त्रोत विहीर आणि नदी / तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच सदर पाण्याच्या नमुन्यामधील आर्सेनिक, लीड, मक्युरी आणि कॅडमियम इ.चं प्रमाण देखील तपासणीसाठी नाशिक येथील खाजगी (NABL) प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.
हेही वाचा -